नाशिक,२६ मे २०२३ : नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. एक व्यक्ती नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचार घेत होता. उपचार घेत असताना त्या व्यक्तीला डॉक्टरांनी मृत घोषित केले. परंतु ती व्यक्ती काही वेळाने बेडवर उठून बसली. त्यावेळी त्या ठिकाणी एकच गोंधळ उडाला. काही लोकांनी तिथून काढता पाय घेतला, तर काही लोकं घाबरुन बाहेर पळाली. काही वेळात डॉक्टर आल्यावर पुन्हा त्या व्यक्तीवर उपचार सुरु केल्याची माहिती मिळाली आहे. ही घटना सर्वत्र वाऱ्यासारखी पसरली आहे
एक व्यक्ती ९३ टक्के भाजला होता. त्याच्यावर उपचार करण्यासाठी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. त्या रुग्णावरती तेथे अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. त्यावेळी तेथे हजर असलेल्या एका प्रशिक्षणार्थी डॉक्टरने त्या रुग्णाला मृत घोषित केले. त्यानंतर नातेवाईकांनी तेथेच रडारड सुरू केली. नातेवाईकांनी ही गोष्ट सगळ्यांना सांगितली. त्यानंतर काहीवेळाने रुग्ण बेडवर उठून बसला अशी माहिती मिळाली आहे. ज्यावेळी रुग्ण उठून बसल्याची माहिती मिळाली, त्यानंतर त्याच्यावर पुन्हा उपचार करण्यात आले.
भाजलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला आणि काही वेळाने तो बेडवर उठून बसला. त्यानंतर पुन्हा वाद होण्याची परिस्थिती ओढावली होती. हे प्रकरण जिल्ह्यात सगळीकडे वाऱ्यासारखे पसरले आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी दिले आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर