चंद्रपूर, १५ डिसेंबर २०२२: मॉर्निंग वॉकला गेलेल्या एका व्यक्तीवर पिल्लासह असलेल्या एका अस्वलाने हल्ला केल्याची घटना घडली आहे. ही घटना सिंदेवाही शहराजवळील रेल्वेस्टेशन जिटीसी रोड परिसरात आज सकाळी सहाच्या सुमारास घडली. नंदू सिताराम शेंडे (वय वर्ष ५०) असे अस्वलाचा हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी नेहमी प्रमाणे नंदु शेंडे मॉर्निंग वॉकला गेले होते. सिंदेवाही शहराजवळील रेल्वेस्टेशन जिटीसी रोडवर अचानक त्यांच्या समोर अस्वल आले. आणि त्या अस्वलाने नंदुवर हल्ला केला. या हल्ल्यात नंदू यांचा डोळा, नाक आणि डाव्या कुशीत गंभीर दुखापत झाली आहे.
दरम्यान, त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालय सिंदेवाही येथे प्राथमिक उपचाराकरीता दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपुर येथे हलविण्यात आले आहे. या घटनेचा पंचनामा करुन पुढील तपास वनपरिक्षेत्र अधिकारी शसालकर यांच्या नेतृत्वात वनविभाग करीत आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर