जालना १ जानेवारी २०२४ :चालू असणारी माध्यमिक शाळाच चक्क जमीन म्हणून खरेदी-विक्री दाखवून शासनाचा महसूल बुडवून विद्यार्थ्यांचे नुकसान करण्याचे धक्कादायक प्रकरण उघड झाले आहे.याबाबत सविस्तर वृत्त असे की पंढरपूर तालुक्यातील सुपली या गावात श्री विठ्ठल शिक्षण प्रसारक संस्थेची माध्यमिक शाळा,वसतिगृह गावठाण हद्दीत गेली 23 वर्षे सुरू आहे सदर संस्थेने शिक्षक वर्गणी ग्रामस्थ मदतीने गट 396/1 मध्ये काही वर्षांपूर्वी नूतन इमारत बांधून शाळा बांधली आहे.सदर प्रशालेत शेकडो मुले शिक्षण घेत आहेत.सदर शाळेचा बेकायदेशीर हस्तांतरण वाद शिक्षण मंत्री व उच्च न्यायालयात सुरू असतानाच दिनांक 24 डिसेंबर 2023 रोजी शाळेचे मुख्याध्यापक व बनावट व्यक्तीने संगनमताने स्वतःच्या नातलग,भावाला विक्री केली आहे.सदर जमीन व्यवहार पूर्व तपासणी अहवाल सादर करताना प्रत्यक्ष पाहणी दरम्यान मंडल अधिकारी यांनी पाहणी करताना त्यांना इमारत शाळा दिसत नव्हती का असा सवाल ग्रामस्थ,प्रत्यक्ष सही दिलेले साक्षीदार करीत आहेत.सदर व्यवहार 2 लाख पंचावन्न हजाराचा दाखवून लाखो रुपयांची शाळा इमारत जागा शेत जमीन दाखवून शासनाचा महसूल आर्थिक संगनमताने बुडवल्याचे निष्पन्न झाले आहे.याबाबत तलाठी असणाऱ्या गीता जाधव यांच्याशी फोनवरून संपर्क केला असता पाहून वरिष्ठांना कळविते असे सांगितले. तर तहसीलदार सुशील बेल्हेकर यांनी वारंवार फोन करूनही उत्तर देण्याचे टाळले आहे.याबाबत मंडल अधिकारी आणि देणारे,घेणारे यांच्यात मोठा आर्थिक व्यवहार झाल्याची चर्चा आहे.
ज्ञानदानाचे कार्य चालणारी गरीब मुलांची स्थानिक शाळा विकणारे मुख्याध्यापक,बनावट मालक संस्था व घेणारे यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी व बेकायदेशीर शाळा जोडणी रद्द करावी अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.सदर व्यवहार रद्द न झाल्यास शाळेतील मुले,पालक व ग्रामस्थ मिळून तहसीलदार सुशील बेल्हेकर यांच्या कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचे पळशी सुपली गावातून पालकांनी इशारा दिला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी :विजय साळी