ए.आर. रहमानवर कोसळला दुःखाचा डोंगर, आईचे झाले निधन

9

पुणे, २९ डिसेंबर २०२०: संगीतकार ए.आर. रहमान यांची आई करीमा बेगम यांचे निधन झाले आहे. रहमान यांनी त्यांच्या आईचा फोटो त्याच्या सोशल मीडिया पेजवर पोस्ट केला आणि या वृत्ताला दुजोरा दिला. करीमा बेगम यांची प्रकृती बिघडली होती, त्या कारणाने त्यांचा मृत्यू झाला. ए. आर. रहमान हे त्यांच्या आईशी अगदी जवळचे मानले जात होते. ते आपल्या प्रत्येक गोष्टीचे श्रेय आपल्या आईला देत होते. ऑस्कर अवार्ड मिळाला तेव्हादेखील त्यांनी त्याचे श्रेय आपल्या आईलाच दिले होते.

ए आर रहमान त्यांच्या आईशी भावनिकदृष्ट्या बांधले गेले होते. त्यांच्या आईच होत्या ज्यांनी त्यांना याबाबत विश्वास व्यक्त करून दिला होता की संगीत-विश्वात रहमान मोठे नाव करतील. ए आर रहमान यांनी एका मुलाखतीत म्हटले होते की, “त्यांच्या मध्ये (आई) संगीत समजण्याची ताकत होती. ज्याप्रमाणे त्या विचार करत असेल त्याच प्रमाणे त्या निर्णय देखील घेत असत. अध्यात्मिक बाबतीत त्या माझ्यापेक्षाही मोठ्या होत्या. उदाहरण म्हणून सांगायचे झाले तर माझ्या संगीत वाटचालीविषयी, मी संगीत विश्वात काहीतरी करावे म्हणून त्यांनी अकरावी मध्येच माझी शाळा सोडण्यास भाग पाडले होते. त्यामुळेच संगीत विश्वात मी आज आहे. त्यांचा या गोष्टीवर ठाम विश्वास होता की माझ्यासाठी संगीत हाच मार्ग योग्य आहे.”

पुढे ते म्हणाले होते की, “मी जेव्हा नऊ वर्षाचा होतो तेव्हाच माझ्या वडिलांचा मृत्यू झाला होता. उदरनिर्वाह करण्यासाठी आई वडिलांचे संगीत साहित्य भाड्याने देत असत. त्यांना इतरांकडून असा सल्ला देखील देण्यात आला होता की, ही संगीत सामग्री विकून त्यातील पैशावर घर चालवावे. परंतु, आईने त्यास नकार दिला. आईचे म्हणणे होते की, माझा मुलगा हेच साहित्य वापरून पुढे संगीतातील काम सुरू ठेवेल.”

त्यांच्या आईचे नाव आधी कस्तुरी होते, नंतर ते बदलून करीमा बेगम असे ठेवण्यात आले. करीमा बेगम यांनी राजागोपाल कुलशेखरन यांच्याशी लग्न केले होते. राजागोपाल कुलशेखरन एक संगीतकार होते. त्याच बरोबर ए आर रहमान यांनी देखील तसेच केले. आपले दिलीप कुमार हे नाव बदलून त्यांनी पुढे आपले नाव ए आर रहमान असे ठेवले.

आईच्या जाण्यामुळे संगीतकार ए आर रहमान यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांचे चाहते व संगीत विश्‍वातील कलाकार त्यांच्या आई प्रती श्रद्धांजली वाहत आहेत. तर दुसरीकडे ए आर रहमान यांचे सांत्वन देखील करत आहेत. गायिका श्रेया घोषाल यांनी ट्विट करून याबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या. त्या म्हणाल्या की, ” तुमच्या आईची मृत्यूची बातमी ऐकून खूप वाईट वाटले रहमान सर. मी आजपर्यंत ज्या लोकांना भेटले त्यातील सर्वात प्रेमळ व दिवंगत व्यक्तींपैकी त्या एक होत्या. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो.”

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव