उस्मानाबाद, ६ ऑगस्ट २०२०: उस्मानाबाद जिल्ह्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे प्रशासन यावर नियंत्रण मिळवण्यासाठी सतत प्रयत्न करत आहे. वेळोवेळी सर्व गोष्टींची दखल घेतली जात आहे. अशाच प्रकारे उमरगा येथे देखील या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आढावा बैठक घेतली.
या बैठकीदरम्यान मृत्यू दरात ४५ ते ६० वयोगटातील दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्यांची संख्या अधिक आहे हे लक्षात आले. यामुळे, अशा वयोगटातील व्यक्तींचा co-morbid सर्व्हे करून त्यांची विशेष काळजी घेण्याच्या सूचना खासदार ओमराजे निंबाळकर यांनी या बैठकीत दिल्या.
यासोबतच, anti- gen टेस्ट चा वापर हा अधिकतर आजाराने ग्रस्त असलेल्या किंवा ४५ ते ६० वयोगटातील व्यक्तींसाठी करावा. रूग्ण आढळल्यास तेथे त्वरित कंटेन्मेंट झोन करून रूग्णांच्या संपर्कात आलेल्यांची त्वरित चाचणी करून त्यांना विलगीकरणात ठेवण्याचे आदेश देखील दिले. तसेच, त्यांना सर्व सोयी सुविधा देण्याच्याही सुचना दिल्या. प्रशासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या सर्व उपाययोजनांचा आढावा घेऊन नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन खासदार ओमराजे निंबाळकर यांनी या बैठकीत केले.
या संबंधित बैठकीत, लोहारा शिवसेना तालुका प्रमुख मोहन पनुरे, उपविभागीय अधिकारी विठ्ठल अवदाने, आरोग्य अधिकारी, तहसीलदार संजय पवार, गटविकास अधिकारी, पोनी श्री.घाडगे, आदी संबंधित अधिकारी उपस्थित होते.
न्यूजअनकट प्रतिनिधी- प्रगती कराड