पुणे: मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांवर पोलिसांनी शनिवारी पुन्हा कारवाईचा बडगा उगारला. संचारबंदी असतानाही मॉर्निग वॉकला बाहेर पडलेले पिंपरी-चिंचवडचे माजी महापौर आर. एस. कुमार यांना पोलिसांनी आज सकाळी रस्त्यावरच परेड करायला लावली. कुमार यांच्यासह निगडी परिसरातील ३५ नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ‘मी नियम मोडणार नाही,’ अशी शपथ त्यांना देण्यात आली.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी घराबाहेर पडू नका, असे वारंवार आवाहन करूनही अनेकजण रस्त्यावर येत आहेत. यामध्ये मॉर्निंग वॉक साठी घराबाहेर पडणाऱ्यांचेही प्रमाण अधिक आहे. निगडी पोलिसांनी शुक्रवारी दहा जणांवर कारवाई केली होती. अशीच कारवाई निगडी, प्राधिकरण परिसरात शनिवारीही करण्यात आली. ३५ जणांना परेड, सूर्यनमस्कार व यापुढे सरकारी आदेशाचे उल्लंघन करणार नाही, अशी शपथ घेण्याची शिक्षा करण्यात आली.
सध्या भाजपमध्ये असलेले माजी महापौर आर. एस. कुमार यांच्यासह ३५ जणांवर संचारबंदीचे उल्लंघन केल्याचा गुन्हा निगडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका, पोलीस प्रशासनाकडून नागरिकांना घराबाहेर पडू नका, असे वारंवार आवाहन केले आहे. मात्र, असे असतानाही नागरिक सकाळी मॉर्निग वॉकला घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे निगडी पोलिसांनी कालपासून मॉर्निग वॉकला बाहेर पडणाऱ्यांवर कारवाई सुरू केली आहे. आज देखील आकुर्डी परिसरात कारवाई करण्यात आली.