फलटण, २२ जानेवारी २०२३ : शहरातील मोठ्या दुकानांमध्ये विकल्या जाणाऱ्या गुटख्यावर कारवाई करण्याचे निवेदन राज्य उत्पादन शुल्क मंत्री नामदार शंभुराजे देसाई यांना फलटणच्या आझाद समाज पार्टीच्या वतीने देण्यात आले.
सध्या फलटण शहर व ग्रामीण पोलिस स्टेशनच्या वतीने तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या दुकानांवर कारवाई केली जात आहे; परंतु ही कारवाई छोट्या-छोट्या दुकानदारांवरती केली जात असल्याने या कारवाईमध्ये सावळा गोंधळ असल्याचे दिसत आहे. पोलिसांनी कारवाई करताना भेदभाव न करता मोठ्या दुकानदारांवरही गुटखा विक्री करताना कारवाई करावी, अशी मागणी आझाद समाज पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे.
फलटण शहर व परिसरात गुटखा, तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री हातगाडे व छोट्या पानटपरीवरती सुरू असते. त्यांच्यावरच कारवाई केली जाते व मोठे होलसेल व्यापारी व मोठ्या दुकानदार यांच्यावर कारवाई केली जात नाही. त्यामुळे फलटण शहर गुटखामुक्त करावे, अशी मागणीही यावेळी आझाद समाज पार्टीच्या वतीने करण्यात आली.
यावेळी आझाद समाज पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष मंगेश आवळे, महादेव गायकवाड, सुनील पवार आदित्य पाटोळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : आनंद पवार