एक अजब प्रकार ; लाखाच्या मोबाईलसाठी लाखो लिटर पाणी उपसले

छत्तीसगड, २७ मे २०२३: एका अधिकाऱ्याचा एक लाख रुपयांचा मोबाईल पडल्याने चक्क बंधाऱ्यातील २१ लाख लिटर पाण्याचा उपसा केल्याची अजब घटना छत्तीसगडमध्ये घडली असून या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. राजेश बिस्वास असे या अधिकाऱ्याचे नाव असून कांकेर जिल्ह्यात ते अन्न निरीक्षक म्हणून काम पाहतात.

खेरकट्टा या छोट्या धरणावर सहलीसाठी आलेल्या बिस्वास यांचा एक लाख रुपयांचा महागडा मोबाईल पाण्यात पडला. १५ फुट खोल पाण्यात पडलेला मोबाईल काढण्यासाठी स्थानिक ग्रामस्थांनाही कामाला लावण्यात आले. त्यांनी ३० एमपीचे दोन डिझेल पंप मागवून धरणातील सारे २१ लाख लिटर पाणी उपसून टाकले. एक मोबाईल बाहेर काढण्यासाठी १५०० एकर शेतीला पुरेल एवढे पाणी बाहेर काढले गेले.

एका ग्रामस्थांने तक्रार केल्यावर सिंचन विभागाचे अधिकारी धरणावर पोहचले व हे काम थांबवण्यात आले व त्यांनी पाण्याचा उपसा बंद केला. तोपर्यंत धरणातील पाण्याची पातळी सहा फुटांनी कमी झाली होती. या प्रकरणी बिस्वास यांना निलंबित करण्यात आले आहे. आता हे प्रकरण उपजिल्हाधिकारी यांच्याकडे गेले असून त्यांनी तातडीने चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा