मोगादिशु (सोमालिया), २८ नोव्हेंबर २०२०: शनिवारी सोमालियाची राजधानी मोगादिशुमध्ये आईस्क्रीमच्या दुकानात झालेल्या आत्मघाती स्फोटात सात जणांचा मृत्यू झाला. अल कायदाशी संबंधित इस्लामिक दहशतवादी संघटना अल-शबाबने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. अमेरिकेचे कार्यवाह संरक्षण सचिव क्रिस्तोफर मिलर यांच्या भेटीनंतर काही तासांनी हा हल्ला झाला आहे. ख्रिस्तोफर मिलर अमेरिकेच्या राजदूत आणि सैन्य दलाच्या जवानांना भेटण्यासाठी मोगादिशुला पोहोचले होते.
सोमालिया सरकारचे प्रवक्ते सलाह उमर हसन यांनी आत्मघाती हल्ल्याची पुष्टी केली आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार या क्रूर आत्मघाती हल्ल्यात सात जणांचा मृत्यू झाला आहे, तर आठ लोक गंभीर जखमी झाले आहेत.
अल-शबाब या दहशतवादी संघटनेने सोमालियाची राजधानी मोगादिशुमध्ये दहशतवादी हल्ला केला आहे. कुख्यात दहशतवादी संघटना अल-शबाबनेही यावर्षी ऑगस्टमध्ये राजधानी मोगादिशुमध्ये दहशतवादी हल्ला केला होता. दहशतवाद्यांनी समुद्र किनाऱ्यावरील एका प्रसिद्ध हॉटेलला लक्ष्य केले.
सुरक्षा दलाने प्रत्युत्तर देत दहशतवाद्यांचा सामना केला. दोन्ही बाजूंनी पाच तास गोळीबार चालू होता. अखेर सुरक्षा दलांनी अतिरेक्यांच्या तावडीतून हॉटेल मुक्त केले. या दहशतवादी हल्ल्यात पोलिस अधिकाऱ्यांसह १६ जण ठार आणि डझनभर जखमी झाले होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे