पुणे १३ जून २०२३: पुणे येथील मार्केट यार्ड गेट क्रमांक १ जवळ असलेल्या, रेवणसिद्ध हॉटेलमध्ये काल रात्री अचानक आग लागली. घटनेच्या वेळी हॉटेलचे कर्मचारी हॉटेलमध्येच झोपले होते. या लोकांना काही समजण्यापूर्वीच आगीने संपूर्ण हॉटेलला वेढले. या आगीत तीन कर्मचारी गंभीररित्या भाजले. माहिती मिळताच पोहोचलेल्या अग्निशमन दलाच्या पथकाने आगीवर नियंत्रण मिळवले आणि भाजलेल्या कर्मचाऱ्यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथे उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला. अन्य एका कर्मचाऱ्याची प्रकृती चिंताजनक आहे.
या घटनेची माहिती देताना स्थानिक लोकांनी सांगितले की, हॉटेलमधून आगीच्या ज्वाळा वाढत असल्याचे पाहून ते घटनास्थळी पोहोचले. हॉटेलमधून कामगारांच्या किंकाळ्या ऐकू येत होत्या. आगीने संपूर्ण हॉटेलला वेढले असल्याने आत जाणे कठीण होते. घाईघाईत लोकांनी जवळच्या पोलीस स्टेशनला आणि अग्निशमन दलाला आगीची माहिती दिली.
घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या पथकाने अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. काही तासांतच आगीवर नियंत्रण मिळवण्यात आल्याचे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याने सांगितले. दलाच्या टीमने हॉटेलमध्ये जाऊन पाहिलं तर कर्मचारी गंभीररित्या भाजलेले आढळले. अन्य काही कर्मचारीही हॉटेलमध्ये अडकले होते, त्यांचीही सुटका करण्यात आली. तडकाफडकी जखमी कर्मचाऱ्यांना रुग्णालयात दाखल केले. भाजल्याने दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला, तर एकावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे प्रथमदर्शनी सांगण्यात येत असून या घटनेचा सध्या तपास सुरू आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी- सूरज गायकवाड