चंद्रपूरमध्ये पोतरा नदीपात्रात वाघ मृतावस्थेत आढळला

चंद्रपूर, १२ फेब्रुवारी २०२३ : चंद्रपूर-वर्धा जिल्ह्याच्या सीमेवरील पोतरा नदीपात्रात एक नर जातीचा वाघ मृतावस्थेत आढळून आल्याने वनविभागात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना शनिवारी (ता. ११) दुपारी चार वाजेच्या दरम्यान उघडकीस आली. वन अधिकाऱ्यांनी मौका पंचनामा करून मृत वाघाचे चंद्रपुरातील टीटीसी केंद्रात शवविच्छेद केले आहे; मात्र वाघाचा मृत्यू संशयास्पद असल्याच्या चर्चा सुरू असल्यामुळे वनविभागाने त्या दिशेने तपास सुरू केला आहे.

याविषयी मिळालेली आधिक माहिती अशी, की चंद्रपूर-वर्धा सीमेवरील पोतरा नदीपात्रात एक वाघ मृतावस्थेत असल्याची माहिती वरोरा व हिंगणघाट येथील वनविभागाला मिळाली. ज्या ठिकाणी वाघ मृतावस्थेत आढळला ती जागा वनपरिक्षेत्र हिंगणघाटच्या अखत्यारीत आहे की वरोऱ्याच्या असा संभ्रम बराच वेळ निर्माण झाल्याने वन अधिकाऱ्यांना घटनास्थळी पोचायला बराच उशीर झाला.

घटनास्थळ मुख्य मार्गावरून आत असल्याने वाघाला तिथून काढण्यासाठी बरीच कसरत करावी लागली. शेवटी रात्री उशिरा शवविच्छेदनासाठी मृत वाघाला चंद्रपूरला टीटीसी केंद्रात रवाना करण्यात आले. वाघ नदीपात्रात मृतावस्थेत आढळून आल्याने सदर प्रकरणाविषयी वेगवेगळ्या चर्चा ऐकायला मिळत आहेत. काहींच्या मते करंट लागल्याने वाघ थोडे अंतर चालून नदीपात्रात पडला व तिथेच मरण पावला असेल, तर अन्य व्यक्तींच्या मते वाघ अज्ञात ठिकाणी मेला व नंंतर त्याला नदीपात्रात फेकण्यात आले अशी चर्चा ऐकायला मिळत आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा