पुणे, दि. १८ मे २०२०: कोरोनाच्या संकटामुळे टाळेबंदीमध्ये अडकलेले मजूर, कामगार, बेघर नागरिक तसेच विद्यार्थी यांचे अन्नावाचून हाल होऊ नयेत या मानवतेच्या जाणिवेतून डी आय सी सी आय तर्फे गरीब गरजूंसाठी करण्यात आलेल्या अन्न वितरण व्यवस्थेचा उपक्रम हा स्तुत्य असल्याचे पोलीस उपायुक्त डॉ. अशोक मोराळे यांनी सांगितले.
श्री. मोराळे यांनी या ठिकाणी भेट देऊन या उपक्रमाचे कौतुक केले. पुणे महानगरपालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड व अन्य अधिकाऱ्यांच्या मदतीने हे तयार भोजन आणि नाष्टा वितरीत करण्यात येत आहे. भोर, वेल्हा आणि मावळ तालुक्यातील अति दुर्गम भागातील ९०० आदिवासी कुटुंबांना २० दिवस पुरेल इतके रेशन पुरवले जात आहे.
तसेच पुणे शहरातील १२९ वस्त्यांतील १५ हजार ५०९ कुटुंबांना तांदूळ, गव्हाचे पीठ, मसाला, मीठ, डाळ यांचा समावेश असलेल्या किराणा मालाचे किट या संस्थेमार्फत वितरित करण्यात आले आहे. या संस्थेच्या उपक्रमाचा आजवर एकूण १ लाख ८० हजार नागरिकांना लाभ झाला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी