शाजापूर, १८ मे २०२३: मध्य प्रदेशातील शाजापूर येथे बुधवार-गुरुवारी मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात ४ जणांचा मृत्यू झाला , तर १५ हून अधिक जण गंभीर जखमी झाले. शाजापूरच्या मॅक्सी येथे ही घटना घडली आहे. स्लीपर बस आणि ट्रॉलीची जोरदार धडक झाली. या अपघातात तीन महिलांसह चार जणांचा मृत्यू झाला असून जखमींची प्रकृती गंभीर आहे.
मॅक्सी पोलिस स्टेशनचे एसआय दीपेश व्यास यांनी सांगितले की, या अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे. वास्तविक हे कुटुंब अहमदाबादला त्यांच्या नातेवाईकाच्या लग्नात सहभागी होण्यासाठी जात होते. बस आणि ट्रॉलीची धडक बसताच कुटुंबीयांना मोठ्या प्रमाणात दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. टक्कर इतकी जोरदार होती की बसचा काही भाग पूर्णपणे खराब झाला आहे.
घटनेची माहिती मिळताच मॅक्सी पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री ३ च्या सुमारास प्रवासी स्लीपर बस मॅक्सी मार्गे अहमदाबादकडे जात होती. त्यानंतर बस समोरून येणाऱ्या ट्रॉलीला धडकली. टक्कर खूप जोरदार असल्यामुळे या अपघातात ४ जणांचा मृत्यू झाला असून त्याचवेळी १५ प्रवासीही जखमी झाले आहेत. त्यांना पोलिसांनी उपचारासाठी उज्जैनला पाठवले आहे.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड