मध्य प्रदेशातील दतिया येथे ट्रक नदीत उलटला, १२ जण ठार तर अनेकजण जखमी

मध्यप्रदेश २८ जून २०२३: मध्यप्रदेशातील दतिया जिल्ह्यात एका निर्माणाधीन पुलाजवळ, एक मिनी ट्रक नदीत उलटला. या घटनेत १२ पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळालीय. याशिवाय ३० ते ३५ लोक जखमी झाल्याची माहिती समोर येतेय. या घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी आणि एसपी घटनास्थळी पोहोचले. राज्याचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी घटनेची माहिती घेतलीय व ते स्थानिक अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, दुर्सांडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बुहारा गावाजवळ पुलाचे काम सुरू आहे. मंगळवारी रात्री लोकांना घेऊन जाणारा ट्रक तिथून जात असताना, नियंत्रण सुटल्याने धुवरा नदीत उलटला. या गाडीतील लोक ग्वालियर येथील बिलहेटी गावातील राहणारे आहेत. बचावकार्य अजून सुरू असुन दतियाचे पोलिस अधीक्षक प्रदीप शर्मा यांच्यासह अन्य अधिकारी घटनास्थळी उपस्थित आहे.

या घटनेत १२ पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झालाय. मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी सांगितले की, या दृर्घटनेत तीन मुलांचा समावेश आहे. आतापर्यंत पाच जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असुन यामध्ये एक १८ वर्षाचा युवक, ६५ वर्षीय महिला आणि ३ लहान मुले आहेत. तर अजून १०-१२ लोकांच्या मृत्यूची भीती व्यक्त केली जात आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असुन पुढील तपास पोलीस करत आहेत.

न्युज अनकट प्रतिनिधी- अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा