बीड, २ फेब्रुवारी २०२४ : एड्सग्रस्त मुलांसाठी अनेक वर्षांपासून काम करणाऱ्या इनफंट ऑफ इंडिया या सामाजिक संस्थेचे संस्थापक दत्ताभाऊ बारगजे यांचे सुपुत्र डॉ. पृथ्वीराज आणि डॉ. जागृती हे २८ जानेवारी रोजी विवाह बंधनात अडकले. लग्न सोहळ्यात पारंपारिक पद्धतीने ज्या-ज्या परंपरा रूढ झालेल्या आहेत आणि ज्या साधारणपणे जपल्या जातात अशा सर्वच वातावरण निर्मिती करणाऱ्या घटकाला स्वखुशीने दूर ठेवून वधू वर वैवाहिक जोडीदार झाले. या लग्नाचा विशिष्ट असा गोरज मुहूर्त नव्हता तसेच मंगलमय वातावरण निर्मितीला सनई, चौघडे, आहेर, मानपान, श्रीफळ, फेटे बांधत सत्कार करण्यासारख्या दिखाऊ थाटामाटालाही निक्षून फाटा देण्यात आला.
लग्न समारंभात विधवांना मानपानापासून दूर ठेवण्याची एक प्रथाच रूढ झाली आहे. परंतु या लग्न सोहळ्यात दत्ताभाऊंना बंधू मानणाऱ्या त्यांच्या निराधार विधवा भगिनींना वधूवरांचे औक्षण करण्याचा मान देण्यात आला. लग्न सोहळ्यावरील होणारी उधळपट्टी कटाक्षाने टाळण्यात आली. रक्तदान, वृक्षारोपण, वृक्ष भेट, स्वच्छता अभियान यासारखे सामाजिक उपक्रम राबवून हा विवाह सोहळा पार पडला.
विशेष म्हणजे अनेक लोकप्रतिनिधी स्वतः या विवाह सोहळ्याचे साक्षीदार ठरले. या विवाहप्रसंगी बीडच्या खा. डॉ. प्रीतम मुंडे, एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुश कदम, लोक बिरादरी प्रकल्पाचे अनिकेत प्रकाश आमटे, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, जयदत्त क्षीरसागर, सुरेश नवले, बजाज ऑटोचे सी. पी. त्रिपाठी, टीएनव्ही अय्यर, पाण्याच्या शिरपूर प्रारूपाचे सुरेश खानापूरकर, एमआयटीच्या संजीवनी कराड, प्रा. सुशीला मोराळे, नरेंद्र मेस्त्री, आरोग्य उपसंचालक डॉ. अशोक थोरात आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी : जितेंद्र शिरसाट