नांदगाव, नाशिक १ डिसेंबर २०२३ : नाशिकमधील नांदगाव-येवला रस्त्यावर सकाळच्या सुमारास भीषण अपघात झाला असून या अपघातात चारचाकी वाहनाखाली चिरडून एका महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे तर एकजण जखमी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मनमाड येथील ब्रिटीशकालीन रेल्वेचा ओव्हरब्रिज ढासळल्याने इंदौर-पुणे महामार्ग पूर्णपणे बंद करण्यात आला असल्याने येथील वाहतूक नांदगाव येवला अशी वळवल्याने रहदारी वाढली आहे. नांदगाव येवला रस्तावरील रहदारी वाढल्याने या रस्त्यावर महिलेचा बळी गेला आहे.
नांदगाव येवला रस्त्यावर मल्हारवाडी गावाजवळ आज शुक्रवार (दि. १) सकाळच्या सुमारास (एम एच १५एफ इ ३०८२) क्रमांक असलेल्या दुचाकीचा अपघात झाला या अपघातात दुचाकीवरील महिला सुनीता माणिकराव जाधव (वय ५० ) यांचा चारचाकी वाहनाच्या चाकाखाली सापडून जागीच मृत्यू झाला. तर दुचाकी स्वार भिकन महादू वाळुंजे (वय ६३) रा ,नाशिक हे गंभीर जखमी झाले आहेत.
या अपघाताची माहिती नांदगाव पोलिसांना कळताच पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी, सहायक पोलिस निरीक्षक नितीन खंडागळे हे तात्काळ अपघातस्थळी दाखल झाले. त्यांनी अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीस रुग्णालयात वैद्यकीय उपचारासाठी हलविले. मृत्यू झालेल्या महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला आहे. या अपघातामुळे रस्त्यावरील वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती. यानंतर रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली असून या घटनेचा पुढील तपास नांदगाव पोलीस करत आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी : नाना आहिरे