अमृतसर, १८ एप्रिल २०२३: पंजाबमधील अमृतसर येथील जगप्रसिद्ध सुवर्ण मंदिरात एका महिलेसोबत गैरवर्तन केल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे मुलीच्या गालावर तिरंगा काढला असल्यामुळे एका कर्मचाऱ्याने त्यावर आक्षेप घेतला. अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात त्या मुलीला प्रवेश करण्यापासून रोखण्यात आले. जेव्हा ती सुवर्ण मंदिरात पोहोचली तेव्हा पगडी घातलेल्या एका व्यक्तीने तिला थांबवले आणि तिला नतमस्तक होऊ दिले नाही. तो मुलीला म्हणाला – हा पंजाब आहे, भारत नाही.
‘खलिस्तानींनी सुवर्ण मंदिराचा ताबा घेतला!’ असे कॅप्शन असलेली ४० सेकंदांची व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे या सर्व प्रकरणाला वेग आला.
शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीच्या (SGPC) अधिकाऱ्याने या संपूर्ण प्रकरणाबद्दल माफी मागितली आहे, परंतु महिलेच्या चेहऱ्यावरील चित्र हे भारतीय ध्वजाचे नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. कारण त्यात अशोक चक्र नव्हते. एसजीपीसीचे सरचिटणीस गुरचरण सिंग ग्रेवाल यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, हे शीखांचे मंदिर आहे. प्रत्येक धार्मिक स्थळाला स्वतःच्या मर्यादा असतात…आम्ही सर्वांचे स्वागत करतो…कुणी गैरवर्तन केले असेल तर आम्ही दिलगीर आहोत. मुलीच्या चेहऱ्यावरचा झेंडा हा आपला राष्ट्रध्वज नव्हता. कारण त्यात अशोक चक्र नव्हते. तो राजकीय ध्वज असू शकतो.”
न्यूज अनकट प्रतिनीधी: केतकी कालेकर