चेन्नई: वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत भारताचे पारडे जड आहे. विंडीजविरुद्ध सलग १०वी वनडे मालिका जिंकण्याची भारताला संधी आहे. भारतीय संघाने आतापर्यंत सलग ९ वनडे मालिका जिंकल्या आहेत. पण या मालिकेत विजय मिळवणे भारतीय संघासाठी सहज असणार नाही. भारताचा मुख्य गोलंदाज भुवनेश्वर कुमार आणि सलामीवीर शिखर धवन दुखापतीमुळे संघाबाहेर आहेत. भुवनेश्वरच्या जागी संघात मुंबईच्या शार्दुल ठाकूरला तर शिखरच्या जागी लोकेश राहुल याला संघात स्थान देण्यात आले आहे. क्रिकेटमध्ये एक काळ असा होता जेव्हा वेस्ट इंडिजचा विजयी रथ भल्याभल्या संघांना रोखता येत नसे. तेव्हा भारतीय संघाने वेस्ट इंडिजविरुद्ध अनेक सामने गमावले होते.
पण आता परिस्थिती बदलली आहे. भारतीय संघ दमदार कामगिरी करत आहे. अशातच दोन्ही संघांमधील पहिला वनडे चेन्नईत होत आहे. टी-२० मालिकेत विजय मिळवल्यानंतर आता वनडे मालिकेत दणदणीत यश मिळवण्यासाठी टीम इंडिया मैदानात उतरेल. नुकत्याच झालेल्या टी-२० मालिकेत विंडीजने एका सामन्यात विजय मिळवत मुकाबला सोपा असणार नाही असा इशारा दिला होता. चेन्नईत होणारा पहिला सामना जर भारताने जिंकला तर तो वेस्ट इंडिजविरुद्धचा हा ६३वा विजय असेल आणि भारत वेस्ट इंडिजच्या पुढे जाईल. आज होणाऱ्या सामन्यात जर भारताने विजय मिळवला तर वेस्ट इंडिज विरुद्धच्या जय-पराजयाच्या प्रमाणात टीम इंडिया प्रथमच पुढे जाईल. दोन्ही संघांनी आतापर्यंत एकमेकांविरुद्ध प्रत्येकी ६२ विजय मिळवले आहेत.