अखेर नारायण राणेंचा जामीनाचा अर्ज मंजूर, न्यायदंडाधिकाऱ्यांकडून ४ अटींसह जामीन मंजूर

महाड, २५ ऑगस्ट २०२१ : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ‘कानाखाली मारली असती’ असे वक्तव्य करून केंद्रीय मंत्री नारायण राणे चांगलेच अडकले आहेत. रत्नागिरी न्यायालयातून अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर आणि मुंबई उच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा न मिळाल्यानंतर त्यांना रत्नागिरी पोलिसांनी अटक करून, महाडच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते. या ठिकाणी सुनावणीवेळी त्यांच्या जामीनासाठी राणेंच्या वकीलाकडून जोरदार युक्तीवाद करण्याता आला. तर, पोलिसांकडून सात दिवसांसाठी पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली होती. रात्री उशीरापर्यंत चाललेल्या या सुनावणीकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. अखेर नारायण राणेंना जामीनाचा अर्ज मंजूर झाला आहे. तर, न्यायलयाने निर्णय देताना, पोलीस कोठडीची गरज नाही असं देखील सांगितलं.

महाड न्यायालयात सुनावणी सुरू असताना नारायण राणे यांच्या पत्नी नीलम राणे यांच्यासह संपूर्ण राणे कुटुंब तिथे दाखल झाले होते. दोन्ही बाजूच्या वकिलांकडून जोरदार युक्तीवाद केला. जवळपास तासभर न्यायालयाचं कामकाज चाललं. २० मिनिटांपेक्षा अधिक वेळ हा युक्तीवाद सुरू होता. जामीन मंजूर करताना महाड कोर्टानं काही अटी घातल्या आहेत.

कोर्टाकडून राणेंना अटीशर्तीसह जामीन

• राणे यांना १५ हजार रुपयाच्या जातमुचकल्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. तसंच त्यांना भविष्यात असं वक्तव्य करता येणार नाही.

• ऑडिओ चेक करण्यासाठी राणे यांना एकदा पोलीस ठाण्यात यावं लागणार आहे. त्यासाठी राणे यांना ७ दिवस आधी नोटीस दिली जाईल.

• त्याचबरोबर ३० ऑगस्ट आणि १३ सप्टेंबरला रायगड गुन्हे शाखेत हजेरी लावावी लागणार आहे. या दरम्यान, कागदपत्रे आणि पुराव्यांसोबत छेडछाड करता येणार नाही, असंही महाड कोर्टानं राणेंना बजावलं आहे.

सरकारी वकिलांचा युक्तीवाद

नारायण राणे यांच्या एका विधानामुळे अनेक चुकीच्या घटना घडल्या आहेत. राणेंचं वक्तव्य बेजबाबदारपणाचं आहे, असा युक्तिवाद सरकारी वकिलांकडून करण्यात आला आहे. महाड पोलिसांनी नरायण राणे यांची ७ दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. मात्र, प्रथम वर्ग न्याय दंडाधिकाऱ्यांनी सरकारी वकिलांची ही मागणी फेटाळून लावल्याचं पाहायला मिळत आहे.

राणेंच्या वकिलांचा युक्तीवाद

तर दुसरीकडे नारायण राणे यांच्या वकिलांकडून राणे यांनी केलेलं विधान हे सार्वजनिक रित्या केलं होतं. त्यामुळे त्यामागे कुठलाही कट नव्हता असं म्हटलंय. तसंच राजकीय हेतूने प्रेरित होऊन पोलिसांनी राणेंवर कलमं लावल्याचा गंभीर आरोपही राणेंच्या वकिलांनी केला. तसंच राणेंच्या अटकेसाठी पोलिसांकडून कुठलंही अटक वॉरंट देण्यात आलं नाही, असा युक्तीवादही करण्यात आला. तसंच राणेंच्या प्रकृतीचं कारण देत राणेंना जामीन देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

 

न्यूज अनकट प्रतिनिधी : ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा