मराठा समाजाचा आज आक्रोश मोर्चा; छ. संभाजीराजे भोसले राहणार उपस्थित

मुंबई, २६ ऑक्टोबर २०२०: मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर मागील दीड महिन्यामध्ये सरकारतर्फे कुठलीही पर्यायी व्यवस्था करण्यात आली नाही. तसेच आज मराठा समाज त्यामुळे शैक्षणिक व नोकरीतील संधीपासून वंचित राहत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये मराठा समाजाने आंदोलन केले. त्याच पार्श्वभूमीवर आज मराठा क्रांती मोर्चातर्फे वांद्रे इथल्या जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश आंदोलन करण्यात येणार आहे. खासदार छत्रपती संभाजीराजे हे ही या आंदोलनात सहभागी होणार आहेत. शनिवारी मराठा क्रांती मोर्चानं घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली होती.

मराठा आरक्षण प्रश्नावर २७ ऑक्टोबरला सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्यात येणार आहे. या याचिकेबाबत काय तयारी करण्यात आली आहे, याबाबतही माहिती देण्यात येत नसल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाकडून करण्यात येत आहे. तसेच मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत राज्य सरकारनं कुठल्याही प्रकारची नोकरभरती करु नये अशी मागणी मराठा समाजाकडून करण्यात येत आहे.

मराठा समाजाकडून असा आरोप केला जात आहे की, मराठा समाज हा मिळणाऱ्या नवीन नोकरीपासून कसा वंचित राहील याचा पूर्व नियोजीत कट करून पहिल्यांदा १२ हजार पोलीस भरती व त्यानंतर आज ९ हजार उर्जा खात्यातील नोकऱ्या जाहीर करून मराठा समाजाच्या खांद्यावर हात ठेवून पाठीत खंजीर खुपसल्यासारखे केले आहे. आरक्षणाअभावी या भरती प्रक्रियेत मराठा समाजाला स्थान मिळणार नसल्याचा आरोप मराठा समाजाकडून करण्यात येतोय. मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत राज्य सरकारनं कुठल्याही प्रकारची नोकरभरती करु नये अशी मागणी मराठा समाजाकडून करण्यात येत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा