पिंपरी चिंचवड: आकुर्डी मध्ये ८० पैसे किलो या दराने आज कांदा विकला जात आहे. राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा आज ८० वा वाढदिवस आहे. या कारणास्तव राष्ट्रवादी काँग्रेस कडून आज आकुर्डी येथे चक्क ८० पैसे दराने कांदा विकला जात आहे. त्यामुळे या भागात प्रचंड झुंबड उडाली आहे. कांद्याचे दर गगनाला भिडले असता अशी संधी मिळाल्यामुळे नागरिकांची मोठी गर्दी झाली आहे.
गेला महिनाभर लोक कांदा काटकसरीने वापरत आहेत. १०० ते १५० रुपयांपर्यंत कांद्याचे भाव गेले आहेत त्यामुळे स्वयंपाकातून कांदा जवळजवळ हद्दपार झाला आहे. या सर्वांमध्ये अशी संधी मिळाल्यामुळे येथे महिलांची मोठी रांग लागली आहे. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद झालेला दिसत आहे.