‘आनंदी गोपाळ’ ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट

पुणे: गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची (पिफ) गुरुवारी (ता.१६) सांगता झाली. सांगता समारंभावेळी या वर्षीच्या सर्वोत्कृष्ट पुरस्कार प्राप्त चित्रपटांची घोषणा करण्यात आली.  पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मराठी विभागात समीर विद्वांस दिग्दर्शित ‘आनंदी गोपाळ’ या चित्रपटाने बाजी मारली आहे. या चित्रपटाला गुरुवारी राज्य सरकारतर्फे देण्यात येणाऱ्या संत तुकाराम आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट पुरस्कार देण्यात आला.

नऊ जानेवारीपासून सुरू असलेल्या १८ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची (पिफ) सांगता गुरुवारी झाली. महोत्सवादरम्यान विविध देशांमधून आलेल्या ज्युरींनी १९१ चित्रपटांचे परीक्षण करून विजेते घोषित केले. यामध्ये ट्युनिशियाचा ‘अ सन’ हा चित्रपट यंदाचा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला. तर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाच्या पुरस्काराने बार्तोज क्रुल्हिक यांना ‘सुपरनोव्हा’ या चित्रपटासाठी गौरविण्यात आले. मराठी विभागात ‘आनंदी गोपाळ’ सर्वोत्कृष्ट ठरला. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्काराने स्रीभ्रूण हत्येवरील ‘वाय’ चित्रपटाचे दिग्दर्शक डॉ. अजित वाडीकर यांनी गौरविण्यात आले.

मराठी विभागात ‘आनंदी गोपाळ’ चित्रपटाप्रमाणे अजित वाडीकर दिग्दर्शित ‘वाय’ आणि सुजय डहाके दिग्दर्शित ‘तुझ्या आईला’ या चित्रपटांनीही चांगले यश मिळवून महोत्सवातील विविध पुरस्कारांवर आपले नाव कोरले. आनंदी गोपाळ चित्रपटाचा मुख्य अभिनेता ललित प्रभाकर याला सर्वोत्कृष्ट अभिनेता, तर ‘वाय’ चित्रपटातील अभिनेत्री मुक्ता बर्वेला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा