नवी दिल्ली, ३ मार्च २०२३ : सत्तावादी दृष्टिकोनाचा अंगीकार करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप निरंकुशतावाद सत्ता चालवीत आहेतअसा आरोप करीत दिल्लीकरांना हे पटवून सांगण्यासाठी आम आदमी पक्षाने कंबर कसली आहे. या अनुषांगाने पक्षाने ‘मायक्रो प्लॅनिंग’ केले असल्याची माहिती समोर आली आहे. पक्षाने आपली प्रतिमा जनमानसांत कायम ठेवण्यासाठी ही योजना आखल्याचे बोलले जात आहे.
राजधानी दिल्लीतील कथित अबकारी धोरणातील घोटाळा प्रकरणात ‘सीबीआय’ने आम आदमी पक्षाचे वरिष्ठ नेते; तसेच माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अटक केली आहे. या अटकेविरोधात ‘आप’चे स्वयंसेवक रस्त्यावर जनजागृती करताना दिसून येतील. ‘आप’ने राज्यभरात अडीच हजार ‘नुक्कड सभां’चे आयोजन केले आहे. या आयोजनातून पक्ष भाजपच्या निरंकुशतावादसंबंधी सर्वसामान्यांना माहिती देतील.
गोपाल राय यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मोदी सरकारद्वारे केंद्रीय तपास यंत्रणेच्या दुरुपयोगासंदर्भात दिल्लीकरांना माहिती देण्यासाठी मोहल्ला; तसेच नुक्कड सभांचे आयोजन करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. भाजपचा खरा चेहरा उघडकीस आणण्यासाठी आज शुक्रवारपासून दिल्लीतील सर्व ७० विधानसभा मतदारसंघांत स्वयंसेवकांची बैठक आयोजित केली जाईल, अशी माहिती पक्षाकडून देण्यात आली आहे.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : अमोल बारवकर