उद्धव ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारताच त्यांनी आरे कॉलनी आणि परिसरातील मेट्रो कारशेडसाठीच्या कामाला स्थगिती दिली.
आरेतील वृक्षतोडीसंदर्भात यापुढे झाडांच्या पानालाही धक्का लागू दिला जाणार नाही असेही मुख्यमंत्री म्हणाले.
आरे कॉलनीत होणाऱ्या मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती देण्यात आली आहे. याचं पुनर्परीक्षण केल्याशिवाय पुढील काम होणार नाही.
कोणतीही विकासकामे रखडणार नाहीत, पण आपलं वैभव गमावून विकासकामे होणार नाहीत.
याआधी ऐन निवडणुकीच्या काळात युती सरकारने कारशेडच्या कामासाठी रातोरात अडीच हजारच्या आसपास झाडे कापली होती. ज्याचे तीव्र पडसाद पर्यावरणप्रेमी तसेच नागरिकांमध्ये उमटले होते. तेव्हा यावर आमचं सरकार आल्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली होती. त्यांनी आज त्याची वचनपूर्ती केल्याची चर्चा आहे.
दरम्यान, ही स्थगिती फक्त कारशेडच्या कामाला आहे. त्यामुळे मेट्रोचं काम सुरुच राहणार आहे, अशी माहिती समोर येत आहे.