कराड, २५ ऑक्टोंबर २०२२: राऊल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो चालू आहे तर ही पदयात्रा ७ नोव्हेंबरला नांदेड जिल्ह्यात येत आहे. ही पदयात्रा येत्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पराभव करेल, असा ठाम विश्वास पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची आग्रही मागणी त्यांनी केली. साताऱ्यात पत्रकार परिषदेत पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक २२ वर्षांनी पक्षाच्या घटनेनुसार झाली. मल्लिकार्जुन खरगे हे अध्यक्ष झाले असून, त्यामुळे काँग्रेसला उभारी मिळेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार घालविण्यासाठी काँग्रेसलाच पुढाकार घ्यावा लागेल. त्यासाठी काँग्रेस सोडून गेलेल्यांना पुन्हा स्वगृही आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणूक आयोगाबरोबरच अन्य स्वतंत्र संस्था काबीज केल्या आहेत. केंद्रीय निवडणूक आयोग स्वायत्त आहे का नाही, असा प्रश्न पडत आहे. ईडीच्या तावडीतून सुटण्यासाठी राज्यात डबल इंजिनचे सरकार आहे. ही तर तात्पुरती व्यवस्था असून, त्याचा जनतेला फटका बसत असल्याची टीका चव्हाण यांनी केली. दरम्यान देशभरातील वाढती महागाई, बेरोजगारी आणि इतर प्रश्न लक्षात घेता काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ७ सप्टेंबरपासून कन्याकुमारी येथून ‘भारत जोडो यात्रे’ला सुरुवात केली आहे. काँग्रेसची ही पदयात्रा पाच महिने चालणार तर या मोहिमेत पक्षाचे कार्यकर्ते आणि नेते पाच महिने सर्व राज्यांमध्ये पदयात्रा करणार आहेत. या पाच महिन्यांत १२ राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेश देखिल असणार आहे. या संपूर्ण प्रवासाचं एकूण अंतर सुमारे ३५००० किलोमीटर आहे.
तामिळनाडूतील कन्याकुमारी येथून हा प्रवास सुरू झाला असून यात्रा तिरुवनंतपुरम, कोची, निलांबूर, म्हैसूर, बेल्लारी, रायचूर, विकाराबाद, नांदेड, जळगाव, इंदूर, कोटा, दौसा, अलवर, बुलंदशहर, दिल्ली, अंबाला, पठाणकोटमार्गे उत्तरेकडं जाईल आणि शेवटचा टप्पा जम्मू आणि श्रीनगरमध्ये संपणार आहे. कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत निघालेल्या या यात्रेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आत्ता ही यात्रा ७ नोव्हेंबरला महाराष्ट्रात येणार आहे, ही यात्रा दिवाळी निमित्त ३ दिवस स्थगित करण्यात आली आहे, तसेच या यात्रेत राष्ट्रवादी काँग्रेस सहभागी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. शिवाय शेकाप, सीपीआय, सीपीएम आणि जनता दलासह काही स्वयंसेवी संस्थाही यात सहभागी होणार आहेत तर या भारत जोडो यात्रेच भाजप सरकार वर काय परिणाम होणार हे येत्या लोकसभा निवडणुकीत दिसून येणार आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी – वैभव शिरकुंडे