मुंबई ९ जून २०२३ : ‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या रिलीजपूर्वी ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाचा निर्माता अभिषेक अग्रवाल यांनी प्रभू श्रीरामांवर असलेल्या श्रद्धेमुळे आदिपुरुषची १०००० तिकिटे मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. निर्मात्यांनी गुगल फॉर्मची लिंक शेअर केली आहे ज्याद्वारे लोक चित्रपटासाठी तिकीट बुक करू शकतात. तेलंगणातील सरकारी शाळा, अनाथाश्रम आणि वृद्धाश्रमात ही तिकिटे मोफत दिली जाणार आहेत. प्रभासचा मेगा बजेट ‘आदिपुरुष’ हा चित्रपट येत्या १६ जून रोजी प्रदर्शित होणार आहेत.
अभिषेक अग्रवाल यांच्या या निर्णयानंतर प्रभासची प्रतिक्रियाही समोर आली आहे. प्रभासने लिहिले- ‘सर, हे खरोखरच कौतुकास्पद पाऊल आहे.’ याशिवाय प्रभासचे चाहतेही निर्मात्यांच्या या निर्णयाचे कौतुक केले आहे.या आधी ६ जून रोजी आदिपुरुषच्या निर्मात्यांनी रिलीजपूर्वी एक मोठी घोषणा केली. निर्मात्यांनी सांगितल्यानुसार ‘आदिपुरुष’च्या स्क्रीनिंग दरम्यान, प्रत्येक थिएटरमध्ये हनुमानासाठी एक जागा राखीव ठेवली जाईल, कारण जिथे जिथे रामकथा होते तिथे हनुमानाचा वास असतो असा लोकांचा विश्वास आहे. यामुळेच निर्मात्यांनी हा निर्णय घेतला आहे.
चित्रपट निर्माते अभिषेक अग्रवाल यांनी जाहीर केले की, ते प्रभासच्या आदिपुरुष या चित्रपटाची १० हजार तिकिटे मोफत देतील. त्यांनी ट्वीटमध्ये लिहिले, ‘आदिपुरुष सारखा चित्रपट आयुष्यात एकदाचा बनतो. श्रीराम यांच्याप्रती असलेल्या श्रद्धेमुळे मी आदिपुरुष चित्रपटाची १० हजार तिकिटे मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. तेलंगणामधील सरकारी शाळा, अनाथाश्रम आणि वृद्धाश्रमातील लोकांना ही तिकीटे देण्यात येतील,’ असे त्यांनी म्हटले आहे. याबरोबरच त्यांनी मोफत तिकिटासाठी गुगल फॉर्मची लिंकही ट्वीटमध्ये शेअर केली आहे. निर्मात्याचे हे ट्वीट सोशल मीडियावर चर्चेत आहे.
सोशल मीडियावर याबाबतीत चित्रपट चाहते खुश आहेत. बऱ्याच लोकांनी कमेंट करून अभिषेक यांना धन्यवाद दिले. काहींनी लिहिले ‘उत्तम काम अभिषेक, आदिपुरुष आजच्या पिढीने पाहण्याची गरज आहे. तुमचे खरोखर कौतुक आहे.’ दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले, ‘सर, माझ्या गावातील विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला आहे. कृपया त्यांच्यासाठी तिकिटांची व्यवस्था करा.’ सोशल मीडियावर चाहत्यांकडून अशा सकारात्मक प्रतिक्रिया येत आहेत. ओम राऊत दिग्दर्शित हा चित्रपट १६ जून रोजी देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी- गुरुराज पोरे.