यंदा उजनी मध्ये मुबलक पाणी साठा

4

इंदापूर, : २७ एप्रिल २०२०: दशकात पहिल्यांदाच उजनीमधील पाणीसाठा एप्रिल महिन्याच्या अखेरीसही मुबलक आहे. साधारण या महिन्यापर्यंत, पाणीसाठा अत्यंत कमी होत असल्यामुळे, उजनी नेहमी वादाचे केंद्रबिंदु ठरत आले आहे. परंतु यंदा मात्र समाधानकारक पाणीसाठ्यामुळे उजनीचे पाणी पेटण्याची चिन्हे नाहीत.
गेल्या वर्षीच्या अखेरच्या टप्प्यात जोरदार बरसलेल्या पावसाचा हा चांगला परिणाम यंदा उजनीच्या पाण्यावर दिसुन येत आहे. अगदी सुरवातीपासूनच एप्रिल, मे महिन्यात उजनीचा पाणीसाठा बहुतांश संपण्याचाच इतिहास आपल्याला पहावयास मिळाला आहे. अगदी गेल्या वर्षी आजच्या दिवशी उणे ३२.३८ टक्के म्हणजे ४६.१५ टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता. यंदा मात्र एप्रिलच्या ( दि.२७ रोजी ) अखेरीसही प्लस मध्ये म्हणजे उपयुक्त पाणीसाठा ७.३९ टीएमसी अर्थात १३.७९ टक्के म्हणजे एकूण ७१.०४ टीएमसी एवढा आहे.
विशेष म्हणजे उजनी बरोबरच इंदापुर, दौंड तालुक्यांच्या तलावातील पाणीसाठाही समाधानकारक स्थितीत आहे. वेळोवेळी तलावांना आवर्तन मिळाले आहे. त्यामुळे गेल्या दशकात पाहिल्यांदाच पाणीसंकट टळले आहे. पुणे, नगर व सोलापुर जिल्ह्याची वरदायिनी म्हणून उजनीची ख्याती आहे. मात्र गेल्या दशकभरात पाण्याचा वापर वाढल्याने उन्हाळ्यात पाण्यासाठी मोठा संघर्ष सुरू होत असे. त्यातही इंदापुर, दौंड, कर्जत या तालुक्यात पाणलोट क्षेत्राला वाळवंटी स्वरूप प्राप्त होत असे. हजारो एकर शेती धोक्यात तर पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांची दाहीदिशा भटकंती सुरू होत असे. एप्रिल व मे महिन्यात पाणीसाठा झपाट्याने कमी होत असल्याने जागोजागी पाणलोट क्षेत्रात विद्युत मोटारी व जलवाहिनीची जागा बदलण्यासाठी शेकडो शेतकऱ्यांची धांदल उडालेली असे. अगदी चाऱ्या खोदून पाणी मिळवण्याचा खटाटोप उन्हाच्या तीव्र प्रकोपात सुरू असल्याचे चित्र आजपर्यंत पाहायला मिळाले आहे.
दुष्काळी सोलापुर जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात पाणी सोडावे लागते. त्याचबरोबर शेती सिंचन, औद्योगिकीकरण, विद्युतीकरण, बोगदा, कालवा, बाष्पीभवन यातही मोठ्या प्रमाणात पाण्याचा पातळी कमी होते. त्यामुळे उन्हाळ्यात उजनीच्या पाण्यावरून राज्यातील राजकारण तापलेले असते. या पाण्याच्या राजकारणात खऱ्या धरणग्रस्तांवर मात्र मोठा अन्याय होत असतो.
यंदा मात्र अशी धावपळ पूर्णपणे मंदावली असून, पिण्याच्या पाण्याचे संकटही कोठे जाणवत नाही आणि पाण्याचे राजकारण करण्यासही संधी दिसत नाही. त्यामुळे येत्या पावसाळ्यापर्यंत तरी पाण्याची टंचाई जाणवणार नाही असे चित्र यंदा आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल कणसे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा