पुणे सोलापूर महामार्गावर मळद येथे अपघात

दौंड, १ ऑगस्ट २०२० : तालुक्यातील मळद येथे पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या डांबरीकरणाच्या कामामुळे वाहतूक सेवा रस्त्याने वळविली आहे. येथे शुक्रवारी (ता.३१) मध्यरात्री एक मालवाहू ट्रक उलटून २२ व ११ केव्ही वीजवाहक तारांच्या खांबाला धडकला.  कुरकुंभ बाजूकडून वीज वितरण कंपनीच्या २२ व ११ केव्ही वीजवाहक लाईन पुणे- सोलापूर महामार्गाच्या सेवा रस्त्याच्या बाजूने गेल्या आहेत.

महामार्गाच्या डांबरीकरणाचे काम सध्या कुरकुंभ व मळद हद्दीत सुरू आहे. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक सेवा रस्त्यावरून वळविण्यात आली आहे. शुक्रवारी मध्यरात्री सेवा रस्त्यावरून जाणाऱ्या मालवाहू ट्रकच्या चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. त्यामुळे ट्रक उलटून वीजवाहक तारांच्या खांबाला धडकला. त्यामुळे २२ व ११ केव्ही वीजवाहक तारांचे खांब वाकले व वीजप्रवाह चालू असणाऱ्या तारा तुटून पडल्या. सुदैवाने कोणतीही हानी न झाल्याने अनर्थ टळला.

या वीजवाहक तारा तुटून बाजूच्या तलावाच्या पाण्यात पडल्यास जलचरांना मोठा धोका निर्माण झाला असता. मात्र, सुदैवाने कोणतीही हानी न झाल्याने मोठा अनर्थ टळला. मळद व कुरकुंभ हद्दीतील काही भागाचा घरगुती व शेतीचा वीजप्रवाह खंडित झाल्याने रात्रीच्या वेळी गैरसोय झाली. त्यामुळे खांबाची व वीजवाहक तारांची त्वरित दुरूस्ती करून वीजप्रवाह पूर्ववत चालू करावा, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थ व शेतकऱ्यांकडून होत आहे.

यासंदर्भात वीज वितरण कंपनीचे उपअभियंता पी. आर. साळवेकर यांनी सांगितले की, खांब व तारा दुरूस्तीचे काम करण्यात येणार असून लवकरात लवकर वीज पुरवठा पूर्ववत चालू करण्यात येईल.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा