पुणे, ता. ३ डिसेंबर २०२२ : मालेगावकडून साक्रीकडे वऱ्हाड घेऊन निघालेल्या स्कूल बसला (एमएच-४१, एजी- ९८०५) झालेल्या भीषण अपघातात दोन ठार, तर १८ जण जखमी झाल्याची घटना घडली. ठार झालेल्यांमध्ये एक वृद्धा व अकरावर्षीय मुलीचा सहभाग आहे. शाळेच्या बसमधून लग्नाचे वऱ्हाड साक्रीकडे येत असताना सकाळी साडेअकराच्या सुमारास भडगाव बारीजवळ ही बस उलटून अपघात झाला. या अपघातात एका महिलेसह एका लहान मुलीची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर येत आली आहे.
याविषयी अधिक माहिती अशी, की मालेगाव तालुक्यातील चिंचवे येथील तरुणीचा विवाह साक्रीतील राजे मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. त्यासाठी मालेगाव तालुक्यातीलच एका शाळेच्या बसमध्ये मुलीकडील वऱ्हाड लग्नासाठी येण्यास निघाले. ही बस भडगाव बारीमध्ये आली असता, बसला भीषण अपघात झाला. बारी गावापासून नजीकच असल्याने भडगाव गावातील युवक जखमींना मदत करण्यासाठी तातडीने धावले. त्यांनी बसमधून जखमींना बाहेर काढले. अपघातानंतर जखमींना तत्काळ वडनेर खाकुर्डी प्राथमिक आरोग्य केंद्रात व तेथून येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींपैकी एका गर्भवती महिलेची प्रकृती अत्यवस्थ असल्याने तिला नाशिक येथे हलविण्यात आले.
या अपघातात मखमलाबाई बारकु ह्याळीज (वय ६०, रा. करजगव्हाण) व मयूरी विकास बोरसे (११, रा. कोपरगाव) या दोघी जागीच ठार झाल्या. अपघातातील जखमींची नावे अशी : पूनम पाटील (१०), श्रद्धा पाटील (१३), जे. पाटील (४०, तिघे रा. सुरत), लावण्या चव्हाण (९, रा. जळगाव), मीराबाई बोरसे (३६, रा. शिर्डी), निकिता साळवे (२५), चित्राबाई साळवे (५५), मंगलबाई देवरे (५०), शंकर पवार (५९), रविना साळवे (२०), गायत्री साळवे (१४), बापू साळवे (६०), सुमनबाई खैरनार (६८), सुवर्णा साळवे (४०), मंगलबाई साळवे (४८, सर्व रा. चिंचवे). याशिवाय अन्य काही जखमींवर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अत्यवस्थ असलेल्या महिलेला नाशिक येथे हलविण्यात आले आहे. अन्य जखमींच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील