सातारा, ३० जून २०२३: आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या बोलेरो गाडीचा सकाळी आठ वाजता गोंदवले जवळ भीषण अपघात झाला. यामध्ये १ जणाचा मृत्यू झाला असून ७ जण जखमी झाले आहेत. या अपघातात कल्याण भोसले यांचा मृत्यू झाला. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हे सर्व भाविक सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील गुजरवाडी येथील रहिवासी आहेत.
गोंदवले खुर्दजवळ कार दुसऱ्या कारला ओव्हरटेक करत असताना हा अपघात झाला. माहितीनुसार, आषाढी एकादशीनिमित्त कोरेगाव तालुक्यातील गुजरवाडी येथील प्रगतशील शेतकरी कल्याण भोसले, हे बोलेरोने पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी जात होते. त्यांच्यासोबत कारमध्ये आणखी आठ जण प्रवास करत होते. गोंदवले खुर्दजवळ कार दुसऱ्या कारला ओव्हरटेक करत असताना अचानक बोलेरो कार पलटी होऊन जंगलात कोसळली. गाडीत कल्याण भोसले (४५), चालक अण्णा गाडवे (४२), पप्पू भिसे (४०), दादासाहेब थोरात (४२), सागर भोसले (४५), विजय माने (४५), श्रीमंत पवार (५०) आणि रुद्र भोसले (१३) होते. कोरेगाव येथून हे आठ जण प्रवास करत होते.
अपघाताची माहिती मिळताच दहिवडी पोलीस ठाण्याचे अधीक्षक अक्षय सोनवणे यांनी घटनास्थळी जाऊन अपघाताची माहिती घेतली. लोधवडे, संभाजीनगर येथील नागरिकांनी घटनास्थळ गाठून जखमींना गाडीतून बाहेर काढले. सर्वांना आश्वासन देऊन जखमींना गोंदवले खुर्द येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले तसेच तेथून पुढील उपचारासाठी सातारा येथील मोरया रुग्णालयात दाखल करण्यात आले. सहायक पोलिस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन अपघाताची पाहणी करून रस्त्यावरील वाहतूक सुरळीत केली..
न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड