अमरावती, ११ जानेवारी २०२३ अमरावतीचे अपक्ष आमदार बच्चू कडू यांचा अपघात झाला असल्याची माहिती मिळत आहे. रस्ता क्रॉस करताना त्यांना दुचाकीने धडक दिली. या धडकेत त्यांच्या डोक्याला आणि उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली असून, त्यांना तातडीने अमरावती येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी साडेसहा ते सात वाजेच्या सुमारास हा अपघात झाला आहे. बच्चू कडू हे रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगात येणाऱ्या दुचाकीने त्यांना जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, बच्चू कडू हे डिव्हायडरच्या दिशेने फेकले गेले. या अपघातात आमदार बच्चू कडू यांच्या डोक्याला आणि उजव्या पायाला मोठ्या प्रमाणात इजा आहे. त्यांच्या डोक्याला चार टाके पडले असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे.
- कार्यकर्त्यांना केले ‘हे’ आवाहन
दरम्यान, आपली प्रकृती ठीक असून कार्यकर्त्यांनी संयम राखावा, असे आवाहन त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केले आहे. बच्चू कडू हे अमरावती जिल्ह्यातील अचलपूर विधानसभा मतदारसंघातील अपक्ष आमदार आहेत. ठाकरे सरकारमध्ये मंत्रिपद भूषवल्यानंतर बच्चू कडू एकनाथ शिंदे यांच्यासह सत्तेतून बाहेर पडले होते.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.