इंदापूर तालुक्यात पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; जीवितहानी नाही

12

इंदापूर, २० ऑगस्ट २०२०: इंदापूर तालुक्यातील बळपुडी गावच्या हद्दीत पुणे – सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास माल वाहतूक गाडी टायर फुटल्याने पलटी झाली. यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.

पुणे दिशेहुन सोलापूर दिशेकडे जाणारी मालवाहतूक गाडी( क्र. एम एच ०१ सी एन ६१०३) पुणे दिशेहून सोलापूर दिशेकडे चालली होती. गाडी इंदापूर तालुक्यातील बळपुडी गावच्या हद्दीत आली असता गाडीचा मागील टायर फुटल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने आणि गाडी पलटी होऊन अक्षरशः १० ते १५ फूट फरफटत गेली यामध्ये मालवाहतूक गाडीचे नुकसान झाले असून सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. तसेच हा राष्ट्रीय महामार्ग असल्याने वाहनांची वर्दळ या महामार्गावर असते. गाडी पलटी झाल्यावर पाठीमागून येणाऱ्या वाहनांनी आपल्या वाहनांवर नियंत्रण मिळवत गाडी थांबविली.

यावेळी महामार्गावरून ये-जा करणाऱ्या प्रवाशांनी दुसऱ्या मालवाहतूक गाडीच्या सहाय्याने पलटी झालेली गाडी रस्त्याच्या बाजूला करत वाहतूक सुरळीत केली. याबाबतच्या अपघाताची माहिती समजताच महाराष्ट्र सुरक्षा बलाचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि वाहन चालकाला पुढील उपचारासाठी इंदापूरला रवाना केले. या अपघाताची नोंद इंदापूर पोलिस स्टेशनला करण्याचे काम सुरू आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – निखिल कणसे