तुळजाभवानी मंदिरातील चोरी करणाऱ्या आरोपीला २४ तासात १००% मुद्देमालासह अटक

अहमदपूर, लातूर, २७ जानेवारी २०२४ : अहमदपूर तालुक्यातील तळेगाव येथील तुळजाभवानी मंदिराची दानपेटी फोडून रोख रक्कम व देवीच्या अंगावरील दागिने चोरीची घटना २५ जानेवारीला घडली होती. त्यावरून पोलीस ठाणे अहमदपूर येथे गुन्हा दाखल झाला होता. पोलिस पथकांनी अतिशय कुशलतेने व उत्कृष्टपणे नमूद गुन्ह्यातील आरोपींचा २४ तासात शोध घेऊन त्याच्याकडून १००% मुद्देमाल जप्त केला आहे.

सदर गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेतला असता आरोपी विकास अनिरुद्ध डावरे (वय ३० वर्ष, रा. साठे नगर, अहमदपूर) याला पोलिसांनी त्याच्या घरातून ताब्यात घेतले आणि सदर गुन्हाची चौकशी केली असता त्यांने त्याच्या आणखीन एक साथीदारासह गुन्हा केल्याचे कबुल केले. नमूद गुन्ह्यात चोरलेले दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ५२ हजार रुपयाचा मुद्देमाल आरोपीकडे मिळाल्याने त्याला नमूद गुन्हा अंतर्गत अटक करण्यात आलेली आहे. याव्यतिरिक्त आरोपीने पोलीस ठाणे चाकूर हद्दीत केलेले घरफोडीचे २ गुन्हेही कबूल केले असून त्याच्याकडून गुन्ह्यात चोरलेला मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. गुन्ह्यातील दुसऱ्या फरार आरोपीचा शोध सुरू असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस ठाणे अहमदपूर अंतर्गत होत आहे.

न्यूज अनकट प्रतिनीधी – सलीम शेख

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा