दरोडा, खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी जेरबंद

इंदापूर, दि.१५ मे २०२०: दरोडा व खुनाच्या प्रयत्नातील गुन्ह्यातील तीन महिन्यापासून पोलिसांना चकवा देणाऱ्या दोन आरोपींच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. आरोपींना इंदापूर तालुक्यातील सणसर येथून जेरबंद करण्यात आले आहे.

गिरीश विजय क्षिरसागर (वय २७ वर्षे) ,गौरव विजय क्षिरसागर (वय २५ वर्षे दोघेही रा. सणसर, ता.इंदापूर जि.पुणे ही ताब्यात घेतलेल्या दोघा भावांची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, ३१ जानेवारी रोजी म्हसोबावाडी (ता. इंदापूर) येथे पोपट तुकाराम थोरवे असताना त्यांच्या शेतातून जाणारा खडी क्रशरचा हायवा त्यांच्या शेतातून घेवून जाण्यास क्रशर चालकास नकार दिला, त्यावेळेस बाळा दराडे व त्याचे इतर ३ साथीदार यांनी क्रशरचे मालक गिरीश क्षिरसागर व गौरव क्षिरसागर यांना बोलावून घेतले. यावेळेस बाळा दराडे याने पोपट थोरवे यांना पिस्तूलाचा धाक दाखवला. ” मी बारामती एमआयडीसी मधील डॉन आहे “, असे म्हणून गिरीश क्षिरसागर याने पोपटला जिवंत सोडू नका, असे म्हणून तलवारीने चेह-यावर वार केला. यात थोरवे यांच्या डोळ्याचे बाजूला मार लागला.

त्यानंतर थोरवे यास हायवाच्या पुढे आडवे पाडून त्यांच्या अंगावर ट्रक घालून मारून टाका असे ते म्हणाले, त्यावेळी फिर्यादीची पत्नी सोडविण्यास आली असता तिच्या गळ्यातील मंगळसूत्र, गंठण तसेच कर्णफुले जबरदस्तीने काढून फिर्यादीचे खिशातील पाकीटातले रोख ३५०० रूपये असा एकूण ६३,५००रुपयांचा ऐवज चोरून नेला. फिर्यादीचे नातेवाइक आल्याने आरोपींनी पळ काढला. सदर घटनेमुळे फिर्यादीचे कुटुंब दहशतीचे सावटाखाली होते.

हा गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्याने पोलीस अधीक्षक संदीप पाटील व बारामतीचे अपर पोलीस अधीक्षक जयंत मिना यांनी गुन्ह्याचा समांतर तपास करुन आरोपीस लगेच पकडणेबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांना आदेश दिलेले होते. त्यानुसार आरोपींना ताब्यात घेतले. गुन्हे शाखेच्या पथकास १४ मे रोजी आरोपी हे घरच्यांना भेटण्यासाठी सणसर येथे येणार असल्याची माहिती मिळाली होती.
त्यामुळे पोलीसांनी सणसर येथे जावून वेषांतर करून सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले.

आरोपीस पुढील कारवाईसाठी भिगवण पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले असून अधिक तपास सहा. पोलीस निरीक्षक जीवन माने हे करीत आहेत. सदर तपासामध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट , सहा. पोलीस निरीक्षक जीवन माने हे करीत आहेत. सदर तपासामध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड, अनिल काळे, रविराज कोकरे, सचिन गायकवाड, महेश गायकवाड, निलेश कदम, उमाकांत कुंजीर, ज्ञानेश्वर क्षिरसागर, काशिनाथ राजापुरे, सुभाष राऊत, गुरु गायकवाड यांनी कामगिरी केली.

या गुन्हयातील आरोपी अतुल गावडे, विजय गोफणे यांना यापूर्वीच अटक करण्यात आली असून विजय गोफणे याच्याकडून पिस्तूल व २ काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. त्यावेळी त्यांच्या सोबतचा आरोपी बाळा दराडे हा अंधाराचा फायदा घेवून पळून गेला होता.

गुन्ह्यातील फरारी आरोपी बाळा दराडे हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरुद्ध पुणे व सातारा जिल्ह्यात दरोडा, चोरी, घरफोडी, खुनाचा प्रयत्न, बेकायदा शस्त्र बाळगणे, अपहरण करणे, सरकारी कामात अडथळा आणणे, गर्दी मारामारी असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल गुन्हे दाखल आहेत.

न्युज अनकट प्रतिनिधी: योगेश कणसे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा