पुणे ,५ सप्टेंबर २०२०:अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यापासून पुण्यातील नागरिक बिनधास्त रस्त्यांवर फिरताना दिसत आहेत. अशा बेफिकीर नागरिकांवर शासनाने कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी पुणे पोलिस व ग्रामपंचायत प्रशासन करत आहे.
यावर कारवाई म्हणून मास्क न लावता फिरणाऱ्या बेजबाबदार नागरिकांकडून दंड वसूल केला जातोय. लॉकडाऊन शिथील झाल्यापासून नागरिकांमधील कोरोना आजाराविषयी गांभीर्य कमी झालेले आहे. त्यामुळे लोक बिनधास्त बेजबाबदारपणे रस्त्यांवर मास्क न लावता फिरताना दिसत असतात.अशा नागरिकांकडून आतापर्यंत पोलिसांनी आणि ग्रामपंचायतीने मिळून १ कोटी १३ लाखांचा दंड वसूल केला आहे. पुणे पोलिसांनी आत्तापर्यंत ४० हजार २२५ नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली आहे. शहरासह आता ग्रामीण भागामध्ये देखील कोरोनाचा शिरकाव मोठ्या प्रमाणात झालेला दिसून येतो.
ग्रामपंचायत प्रशासनानेही मास्क न घालणाऱ्या व्यक्तींवर आता दंडात्मक कारवाई सुरू केलेली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वैयक्तिक जबाबदारी व स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ज्ञानेश्वरी आयवळे