बंगळूर, ५ सप्टेंबर २०२०: एका भारतीय कंपनीद्वारे लवकरच बॅटल रॉयल मोबाइल व्हिडिओ गेम FAU-G सुरू करण्यात येणार आहे. बॉलिवूड स्टार अक्षय कुमारच्या भागीदारीत याची सुरूवात होणार आहे. या व्हिडिओ गेमला भारतात पब्जीला बंदी घातल्याचा फायदा मिळण्याची शक्यता आहे. फियरलेस अँड युनाइटेड गार्ड्स (FAU-G) गेम ऑक्टोबरच्या अखेरीस बंगळुरुस्थित एनकोअर गेम्सद्वारे सुरू होईल. वृत्तसंस्था रॉयटर्सने कंपनीचे सह-संस्थापक विशाल गोंडल यांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे.
गोंडाळ यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, ही गेम आणण्याची तयारी काही मागील ब-याच दिवसांपासून सुरू होती. एवढेच काय तर गेमचा पहिला स्तर गलवान व्हॅलीवर आधारित असेल. यावर्षी जूनमध्ये गलवान व्हॅलीमध्ये भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये संघर्ष झाला. या संघर्षात २० भारतीय सैनिक शहीद झाले होते. याच पार्श्वभूमीवर ही गेम आता बाजारात येत आहे.
भारत आणि चीन यांच्यामध्ये सध्या सुरू असलेला सीमा विवाद मुळे गेल्या अनेक दिवसांपासून चीन आणि भारतमध्ये तणावाची परिस्थिती आहे. याच अनुषंगाने भारत सरकारने चीन सोबत डिजिटल युद्ध करताना टिकटॉकसह अनेक लोकप्रिय अॅप्सवर बंदी घातली होती आणि आता लोकप्रिय मोबाइल गेम पब्जीसह ११८ अॅप्सवर पुन्हा बंदी घातली आहे.
रॉयटर्सला दिलेल्या मुलाखतीत गोंडल म्हणाले की, एफएयू-जी चा अर्थ सैन्य असा आहे. हे खेळाडूंसाठी देशभक्तीची प्रेरणा देखील बनेल आणि त्यातील २० टक्के निव्वळ महसूल सरकारच्या ट्रस्टला देण्यात येईल. ही रक्कम सीमेवर आपले कर्तव्य बजावत असताना शहीद झालेल्या सैनिकांच्या कुटुंबीयांना आधार देण्यासाठी वापरली जाणार आहे.
ते पुढे म्हणाले की, अभिनेता अक्षय कुमारनेही या गेमच्या संकल्पनेत मदत केली आहे. गोंडल म्हणाले की, अक्षयने एफएयू-जी या खेळाचे शीर्षक सुचवले होते. गेल्या शुक्रवारी संध्याकाळी बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने अॅक्शन मोबाइल एफएयू-जी जाहीर केला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे