पुणे, दिनांक ११ ऑक्टोबर२०२२ : राज्यात १५ ऑक्टोबर पूर्वी ऊस गाळप सुरू करणाऱ्या, पुणे जिल्ह्यात इंदापूर तालुक्यातील शेटफळ गढे येथील बारामती ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेड कारखान्यावर कारवाई करण्याची मागणी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्याकडे भाजपा आमदार प्रा. राम शिंदे यांनी केली आहे.
राज्यातील २०२२ – २३ या हंगामातील ऊस गाळप कारखाने १५ ऑक्टोबर पासून सुरू करावेत असे निर्देश मंत्री समितीच्या गटाने दिले आहेत. त्यानुसार राज्यातील साखर कारखान्यांनी, या पूर्वी ऊस गाळप सुरू करू नये असे आदेश साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्याकडून देण्यात आले आहेत.
१९ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत, १५ ऑक्टोबर पासून हंगाम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जे साखर कारखाने यापूर्वी हंगाम सुरू करतील त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
शासनाने दिलेल्या निर्देशापूर्वी कारखाना सुरू केल्यास, महाराष्ट्र राज्य साखर कारखाना क्षेत्र आरक्षण व गाळप ऊस वितरण नियम १९८४/६ चा भंग होतो. तथापि बारामती ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेड या कारखान्याने कायद्याचा भंग केला आहे. या कारखान्याने १० ऑक्टोबर २०२२ रोजी कारखान्याचा गाळप हंगाम सुरू केला आहे. त्यामुळे या कारखान्याचे कार्यकारी संचालक, जनरल मॅनेजर, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि इतर संबंधितांवर गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी भाजपा आमदार राम शिंदे यांनी पत्राद्वारे केली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर