“त्या ” हवालदाराची चौकशी करून, चोरट्यांवर कारवाई व्हावी: सूर्यवंशी

इंदापूर, दि.२३ मे २०२०: उरुळी कांचन परिसरात अज्ञात चोरट्याकडून मारहाण होवून लूट झाल्यानंतर, तक्रार घेण्याचे आश्वासन देवून, आरोपींचा शोध लागल्यानंतर उरुळी कांचन पोलीस ठाण्यातील हवालदाराने अवमानित करुन हुसकावून लावल्याने संबंधिताची चौकशी करण्यात यावी व त्या चोरट्यांवर कारवाई व्हावी अशी मागणी कळाशी (ता.इंदापूर) येथील एका वाहन चालकाने अर्जाद्वारे पुणे ग्रामीणच्या पोलीस अधीक्षकांकडे केली आहे. सतीश भानुदास सूर्यवंशी असे अर्ज देणाऱ्या वाहनचालकाचे नाव आहे.

त्याने अर्जात नमूद केल्यानुसार, सूर्यवंशी हा वाहनचालक म्हणून काम करतो. दररोज इंदापूर ते लोणावळा अशी ये- जा त्याला करावी लागते. दि.१९ मार्च २०२० रोजी पिकअप गाडी(क्र.एम एच १४ जी यु ६२७८) मध्ये कांद्याच्या ५० पिशव्या भरुन तो इंदापूरहून लोणावळ्याला निघाला होता.

उरुळी कांचन या ठिकाणी पिकअप पोहोचल्यानंतर तिघा अज्ञात लोकांनी यामाहा दुचाकी आडवी घातली. कांद्याच्या पिशवीची मागणी त्यांनी केली. ती देण्यास नकार दिल्यानंतर या तिघांनी सूर्यवंशी यास बेदम मारहाण केली. त्याच्याकडील १२ हजार ४०० रुपयांची रोकड व अर्धा तोळ्याची सोन्याची अंगठी हिसकावून घेतली. मोबाईल घेतला होता मात्र पळुन जाताना सूर्यवंशी याने त्यांच्याकडून मोबाईल हिसकावून घेतला. पाठीमागून गाडी आल्यामुळे ते तिघे पळून गेले.

त्यानंतर १०० क्रमांकावर फोन लावून सूर्यवंशी याने पोलीसांना घटनास्थळी बोलावून घेतले. पोलिसांनी त्यास पोलीस ठाण्यात नेले.चौकशी करतो असे सांगून त्यास गाडीखाली करून दुसऱ्या दिवशी सकाळी येण्यास सांगितले. दि.२० मे रोजी सकाळी सूर्यवंशी पुन्हा उरुळी पोलीस ठाण्यात गेला.

पोलिसांनी सिसीटीव्ही फुटेजच्या आधारे तिघांना ताब्यात घेतले होते. मात्र तेथे त्यावेळी कार्यरत असणाऱ्या पोलीस हवालदाराने आपणास  उडवाउडवीची उत्तरे देवून दम दिला. तक्रार घेण्यास नकार देवून आपणास तेथून हाकलून दिले, अशी सूर्यवंशी याची तक्रार आहे.

उरुळी कांचन पोलीसांनी केलेल्या अन्यायाची व तेथील तीन अज्ञात इसमानी केलेल्या मारहाण व लुटमारीची चौकशी आपल्या मार्फत करावी. सीसीटीव्ही फुटेजही तपासावे. दोषींवर योग्य ती कारवाई करून आपणास न्याय मिळवून दयावा, अशी मागणी सूर्यवंशी याने पुणे ग्रामीणच्या पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.

आपण वाहनचालक असल्याने आपणास रोज इंदापूर ते लोणावळा ये- जा करावी लागते. सदर इसमांकडून माझे जिविताचे बरे वाईट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसे काही झाल्यास त्यास सर्वस्वी उरुळी कांचन पोलीसांना जबाबदार धरण्यात यावे असे ही अर्जाच्या शेवटी सूर्यवंशी याने म्हटले आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, राज्यमंत्री व इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे व उरुळी कांचनचे पोलीस निरीक्षक यांच्याकडे निवेदनाच्या प्रती पाठवण्यात आल्या आहेत.

न्युज अनकट प्रतिनिधी: योगेश कणसे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा