दोषींवर कारवाई होणार – राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही

इंदापूर, ५ ऑक्टोबर २०२० : ऑगस्ट २०१९ मध्ये आलेल्या महापुरामुळे इंदापूर तालुक्यातील विविध शेतक-यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले. शासनाने त्वरित या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश महसूल व कृषि विभागास दिले. मात्र अधिकाऱ्यांमधील कामचुकारपणा व समन्वयाचा आभाव याचा फटका भाटनिमगांव व अवसरी मधील ८५ शेतक-यांना बसल्याने संतप्त झालेल्या शेतक-यांनी कोरोनाच्या गंभीर स्थितीत दि.३० रोजी अवसरी तलाठी कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन छेडले. याची दखल घेत सदर प्रकाराची शासकीय चौकशी करुन दोषी कर्मचारी व अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल अशी ग्वाही राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी माध्यमांना दिली आहे.

आँगस्ट २०१९ मध्ये आलेल्या महापूरामुळे भाटनिमगाव येथील ९६ शेतकऱ्यांची व अवसरी येथील २३ शेतकऱ्यांच्या शेती पूर्णपणे पाण्याखाली गेली होती. शेतक-यांची पिके उध्वस्त झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले होते.इंदापूर प्रशासनाने गाव कामगार तलाठी, गावातील ग्रामसेवक व कृषी सेवक यांना संयुक्त पंचनामा करण्याचे आदेश दिले होते.वरिष्ठ कार्यालयाच्या सूचनेनुसार संबंधित तलाठी व ग्रामसेवक यांनी पंचनामे केले मात्र सदर पंचनाम्यावर कृषिसेवक अनुपमा देवकर यांची सही नसल्याचे आढळून आले आहे.तलाठी अजित पाटील यांनी त्यांना विश्वासात न घेता पंचनामे करून घेतले असल्याचा आरोप त्यांनी केला असून तसा तक्रारी अर्ज दि.१४ ऑगस्ट २०१९ रोजी तालुका कृषी अधिकारी व तहसीलदार सोनाली मेटकरी यांना त्यांनी सादर केला आहे. मात्र या सावळ्या गोंधळात ८५ शेतक-यांचा पंचनामा शासन दरबारी वेळेत न दाखल झाल्याने लाखो रुपयाच्या नुकसान भरपाई पासून शेतकरी वंचित राहीले आहेत.

शेकडो शेतकरी वर्गाने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या दरबारी धाव घेऊन आपल्या व्यथा मांडत दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा व आम्हाला नुकसान भरपाई द्या अशी मागणी केली असून याबाबत माध्यमांनी दत्तात्रय भरणे यांना विचारणा केली असता कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही. संपूर्ण प्रकाराची चौकशी करुन दोषी कर्मचारी व अधिकारी यांवर कारवाई केली जाईल अशी ग्वाही राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे.

प्रशासनात सर्व काही चालते आलबेल ! खुद्द अधिकाऱ्यांनीच केला खुलासा.

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांसमोरचं तहसीलदार सोनाली मेटकरी यांना या प्रकरणावर आपण काय सांगाल आपली भुमिका काय आहे असे विचारले असता त्या म्हणाल्या कि तलाठी आणि कृषिसहाय्यक यांच्यातील समन्वया अभावी हा घोळ झाला आहे मात्र ही गोष्ट २०१९ ची आहे. आज त्यामध्ये आम्ही काही करु शकत नाही मात्र त्यांना आम्ही पुढे अँडजेस करु ! याचा अर्थ प्रशासन अलबेल चालत आहे असा होतो.जो तो आपपल्या सोईप्रमाणे काम करत असल्याने खरा लाभार्थी मात्र यात बळीचा बकरा बनतो हे स्पष्ट होते.

ज्यावेळी संबंधित कृषि सहाय्यक यांनी वरिष्ठ कार्यालयात लेखी अर्ज स्वरुपात वस्तुस्थिती कळवली होती त्यावेळीच या विषयावर अधिकारी वर्गाने याची चौकशी करुन वेळीच चुका सुधारल्या असत्या तर आज या शेतक-यांना बोंबा माराव्या लागल्या नसत्या. आता मात्र न्यायासाठी ते केवळ बोंबा मारुन थांबणार नाहीत.तर प्रसंगी हा पेटलेला टेंबा शेतकरी जिल्ह्याच्या ठिकाणपर्यंत ही मिरवतील यात शंका नाही.

लाभार्थी एक मात्र खातेदार तिसराचं – शेतक-यांचा आरोप.

यावेळी दत्तात्रय घोगरे यांनी सांगितले की पिठेवाडी निरनिमगाव, चाकाटी,या गावात पूरग्रस्त निधी आला असला तरी तलाठी यांच्या हलगर्जीपणामुळे खाते नंबर चुकल्याने संबंधित शेतकऱ्याला मिळणारे पैसे दुसऱ्याच व्यक्तीच्या नावावर जमा होतात, ती व्यक्ती पैसे काढून खर्च करत असल्याने संबंधित शेतकऱ्यांना खाते नंबर दुरुस्त करून निधी उपलब्ध करून दिला पाहिजे.

प्रतिनिधी निखिल कणसे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा