आदिपुरुष चित्रपटातील कलाकार पोहोचले तिरुपतीला, तिरूमाला मंदिरात घेतला आशीर्वाद

मुंबई, ६ जुन २०२३: आदिपुरुष या चित्रपटाच्या प्री-रिलीज कार्यक्रमापूर्वी प्रभासने मंगळवारी तिरुपती येथील तिरुमाला मंदिराला भेट दिली. अभिनेता प्रभास आणि आदिपुरुषची टीम त्यांच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशन मध्ये कोणतीही कसर सोडत नाहीये. मंगळवारी संध्याकाळी चित्रपटाच्या प्री-रिलीज कार्यक्रमापूर्वी, अभिनेत्याने तिरुपतीमधील तिरुमाला मंदिराला भेट देत चित्रपटाच्या यशासाठी आशीर्वाद मागितला.

या चित्रपटाचा दुसरा ट्रेलर लवकरच प्रेक्षकांसाठी प्रदर्शित होणार आहे. आधी पुरुष चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सर्व कलाकार तिरुपतीमध्ये पोहोचले. यावेळी मंदिरात आशीर्वाद घेत असताना प्रभासने पांढरा कुर्ता पायजमा आणि लाल रेशमी शाल हा भारतीय पोशाख परिधान केला होता. आदिपुरुष, हा चित्रपट रामायण या महाकाव्यावर आधारित आहे. चित्रपटाचा पहिला ट्रेलर काही काळापूर्वी सुधारित व्हीएफएक्ससह प्रदर्शित करण्यात आला होता‌. त्यानंतर या चित्रपटातील कलाकारांना प्रेक्षकांचे उदंड प्रेम मिळत आहे.

चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान, क्रितीने प्रभास एक व्यक्ती म्हणून “प्रभू राम इतका साधा” असल्याचे सांगितले होते.या चित्रपटात प्रभास राजा राघवच्या भूमिकेत आहे, जो १४ वर्षांसाठी जंगलात वनवासासाठी गेला आहे तर त्याच्या पत्नीची म्हणजेच जानकीची भूमिका क्रिती सॅननने अगदी चोख पार पाडली आहे. त्याचप्रमाणे सनी सिंग लहान भाऊ लक्ष्मणाच्या भूमिकेत पाहायला मिळतो. एवढेच नाही तर सुप्रसिद्ध अभिनेता सैफ अली खान देखील या चित्रपटाचा भाग असून तो या चित्रपटात रावणाची भूमिका साकारताना दिसणार आहे.

अलीकडेच, रामानंद सागर यांच्या रामायण या प्रतिष्ठित मालिकेत लक्ष्मणाची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते सुनील लाहिरी यांनी सनीने आदिपुरुषमधील भूमिका साकारल्याबद्दल प्रतिक्रिया दिली. ‘सनी एक चांगला अभिनेता असल्याने तो ही भूमिका अतिशय उत्तम रित्या पार पाडेल याची मला खात्री आहे’,असे म्हणत त्यांनी सनीचे कौतुक केले. देवदत्त नागे आणि भूषण कुमार यांच्या टी-सिरीज निर्मित, आदिपुरुष हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलुगु, कन्नड आणि मल्याळम या भाषांमध्ये १६ जून रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी:- ऋतुजा पंढरपुरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा