अभिनेत्री पुजा भट्ट ‘भारत जोडो’ यात्रेत सामील, राहुल गांधींची घेतली भेट

हैदराबाद, २ नोव्हेंबर २०२२;काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या भारत जोडो यात्रेचा आज ५६ वा दिवस आहे. तर तेलंगणा मधील आठवा दिवस आहे. या दरम्यान चित्रपट अभिनेत्री पूजा भट्ट आज या यात्रेत सहभागी झाली होती. यावेळी तिने राहुल गांधी यांची भेट घेतली.

या यात्रेत सामील होणारी पूजा भट्ट ही पहिली बॉलिवूड व्यक्ती आहे. यावेळी पूजा भट्टने फुल स्लीव्हज काळ्या रंगाचा कुर्ता आणि प्रिंटेड स्टोल परिधान केला होता. या दरम्यान अभिनेत्रीला पाहण्यासाठी समर्थकही खूप उत्सुक दिसत होते.

महाराष्ट्राचे माजी ऊर्जामंत्री ‘भारत जोडो’ यात्रेत जखमी

तर दुसरीकडे ‘भारत जोडो’ यात्रेत सहभागी झालेले महाराष्ट्राचे माजी मंत्री जखमी झाले आहेत. राहुल गांधी यांची पदयात्रा सध्या हैदराबादेत असून या यात्रेत माजी ऊर्जामंत्री नितीन राऊत देखील सहभागी झाले होते. यात्रे दरम्यान गर्दीचा धक्का लागल्याने नितीन राऊत रस्त्यावर कोसळले. त्यामुळे त्यांच्या डोक्याला जखम झाली आहे. तसेच त्यांच्या पायाला थोडा मुकामार देखील लागला आहे.

दरम्यान, कार्यकर्त्यांनी त्यांना जवळील रूग्णालयात दाखल केले. तेथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले असून आता त्यांची प्रकृती ठीक आहे.

‘या’ दिवशी ‘भारत जोडो’ यात्रा महाराष्ट्रात :

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काश्मीर ते कन्याकुमारी निघालेली ‘भारत जोडो’ यात्रा ७ नोव्हेंबरला महाराष्ट्रात प्रवेश करणार आहे. कन्याकुमारी येथून सुरू झालेल्या यात्रेने केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा या राज्यातून प्रावस पूर्ण केलेला आहे. या संपूर्ण यात्रेत राहुल गांधी ३,७५० किमीचा प्रवास करत आहेत. एकूण १२ राज्यांतून ही यात्रा जाणार असून यात्रेला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा