मुंबई, १७ ऑगस्ट २०२२ : आजपासून विधान परिषदेचे अधिवेशन सुरु झाले. अधिवेशनाचा पहिला दिवस आज विरोधकांनी गाजवला. शिंदे गटावर निशाणा साधत “आले..आले ५० खोके आले, आले रे आले गद्दार आले” असे विधानभवनाच्या पायरीवर बसून नारे दिले. एकुणातच अधिवेशनाची सुरुवात विरोधकांच्या आक्रमकतेने झाली. विधानपरिषदेच्या सभापतीपदी देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती करण्यात आली. तर उपसभापती नीलम गोऱ्हे स्थानापन्न झाल्या.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडण्यात आला. तर उपराष्ट्रपती यांचेही यावेळी अभिनंदन करण्यात आले, तर या अभिनंदन प्रस्तावाला सर्व पक्षाने पाठिंबा दिला.
या अधिवेशनात अजित पवार आक्रमक झालेले पहायला मिळाले. यावेळी अजित दादानंतर छगन भुजबळ आणि बाळासाहेब थोरात यांना बोलायची संधी मिळाली नाही. त्यामुळे मुनगंटीवार यांनी आता पुढे जाऊ असं म्हंटल्यानंतर नवीन पद्धत पाडू नका, त्याचबरोबर मध्येच मंत्री उठून गेले, या मुद्द्यांवर अजितदादा क्रोधीत झाले. त्यानंतर विधेयकाच्या नंबरवरुन विरोधकांनी शिंदे सरकारला घेरले. त्यात विधेयक नंबर १७ च्या ऐवजी १८चा उच्चार भाजपकडून झाला. त्यामुळे विरोधकांनी सभागृहात गदारोळ केला. यावर भास्कर जाधव भडकून विरोधकांचे म्हणणे ऐकून घ्या असं म्हणत आवाज वाढवला.
मंत्र्याकडून पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या. २५ हजार ८२६ कोटींच्या मागण्या यावेळी शिंदे गटाकडून सादर करण्यात आल्या.
आदित्य ठाकरे यांनी शिंदेगटावर थेट हल्ला चढवला. हे सरकार बेईमानीचं सरकार आहे. त्यांना जनतेचा आवाज ऐकू येत नाही. हे केवळ राजकारण चालू आहे. आम्ही घटनेचे सेवक आहोत. न्यायदेवतेकडे न्याय मागितला आहे. व्हिप हा शिवसेनेचा म्हणजे आमचाच आहे, असे आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.
आशिष शेलार वरळीमध्ये दहीहंडी करण्यावरुन आदित्य ठाकरे यांनी टोला लगावला. दोन वर्षानंतर कोविडचा काळ असून त्यानंतर आता सण साजरा होत आहे. ज्यांना सण साजरा करायचा त्यांनी साजरा करावा. आम्ही कुठेही बालिशपणा, पोरकट पणा करत नाही. असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी माध्यमांना सांगितलं.
भाजपच्या खात्याला ११ हजार तर शिंदे गटाला ६ हजार कोटीचा निधी मान्य झाल्यानंतर सुनील प्रभू यांनी शिंदे गटावर टीका केली. आता दूध का दूध पानी का पानी होताना दिसतंय. अशा शब्दात टिका करत पुन्हा एका शिंदे गटाला टार्गेट करण्यात आले.
एकुणातच आज पहिला दिवस हा विरोधकांनी हल्ला बोल करत गाजवला. आता प्रतिक्षा उद्याच्या दिवसाची. उद्या काय घडणार, कोणावर हल्ला आणि कोणाला टोला, हे उद्याच कळेल.
न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस