गणपतीपुळे सह अन्य समुद्रकिनाऱ्यावर न जाण्याचे प्रशासनाचे पर्यटकांना आवाहन

रत्नागिरी, १२ जून २०२३: बिपरजॉय वादळामुळे समुद्र खवळलेला असून १६ जूनपर्यंत ही स्थिती राहण्याची शक्यता हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आली आहे. खवळलेल्या समुद्रात उंच लाटा उठत असून किनाऱ्यांवर धडका देत आहेत. त्यामुळे गणपतीपुळेसह रत्नागिरीतील भाट्ये, आरेवारे, नेवरे या किनाऱ्यावर पर्यटकांनी पाण्यात उतरु नये असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

मागील तीन-चार दिवसांपासून बिपरजॉय वादळाचा परिणाम किनाऱ्यावर जाणवत आहे. रविवारी भरतीच्यावेळी आलेल्या एका मोठ्या लाटेने तालुक्यातील प्रसिध्द पर्यटनस्थळ असणाऱ्या गणपतीपुळे येथे मोठा तडाखा दिला होता. यात अनेक पर्यटक पाण्याबरोबर वीस ते पंचवीस फूट किनाऱ्याकडे ढकळलेले गेले होते. रस्ता आणि किनाऱ्याच्यामध्ये असणाऱ्या संरक्षण भिंतीवर उभे असणारे पर्यटकही लाटेच्या माऱ्याने खाली पडले होते.

पालकमंत्री उदय सामंत यांनी आज गणपतीपुळे येथे भेट देऊन पाहणी केली. यावेळी प्रांताधिकारी विकास सुर्यवंशी, तहसीलदार राजाराम म्हात्रे, गटविकास अधिकारी जे.पी. जाधव व अधिकारी वर्ग उपस्थित होते. यावेळी ४९ व्यापाऱ्यांचे नुकसान झाल्याची माहिती पुढे आली असून त्यांना नुकसान भरपाई देण्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी जाहीर केले आहे. यावेळी सरपंच कल्पना पकीये, विवेक भिडे, अमित घनवटकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा