पुणे, ४ डिसेंबर २०२२: भारत आणि बांगलादेश यांच्यातील तीन एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना रविवारी मीरपूर येथे होणार आहे. टीम इंडिया ७ वर्षांनंतर बांगलादेशमध्ये एकदिवसीय सामना खेळणार आहे. भारताने २०१५ मध्ये येथे शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता. पुढील वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये या फॉरमॅटचा विश्वचषक भारतात होणार आहे. त्याच्या तयारीच्या संदर्भात, भारताने या मालिकेत आपला पूर्ण ताकदीचा संघ उतरवलाय. भारतीय वेळेनुसार सकाळी साडेअकरा वाजता सामना सुरू होईल.
सर्व प्रथम हवामान अहवाल पाहू
डिसेंबर महिन्यात ढाका/मीरपूरमध्ये खूप धुकं असतं. रविवारीही हे घडणार आहे. तथापि, फ्लडलाइट्सच्या उपस्थितीत ही समस्या कमी होईल. पावसाची शक्यता शून्य आहे. संपूर्ण सामन्यात कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान १७ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. सामन्यात दव पडण्याचा किमान प्रभाव असल्यानं भारताच्या वेळेनुसार सकाळी साडेअकरा वाजता सामना सुरू होतोय.
हा सामना मीरपूरच्या शेर-ए-बांगला नॅशनल स्टेडियमवर होणार आहे. मे २०२१ नंतर प्रथमच येथे एकदिवसीय सामना होणार आहे. आतापर्यंत प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने १२ वेळा ३००+ धावा केल्या आहेत. या मैदानावर वनडेतील सर्वात मोठी धावसंख्या करण्याचा विक्रम टीम इंडियाच्या नावावर आहे. २०११ च्या विश्वचषकात भारताने येथे ३७०/४ धावा केल्या होत्या.
भारत आणि बांगलादेश यांच्यात आतापर्यंत १३ वनडे सामने झालेत. टीम इंडियाने यापैकी ९ जिंकलेत. बांगलादेशने ३ सामने जिंकले आहेत. १ सामना अनिर्णित राहिलाय. आतापर्यंत बांगलादेशमध्ये दोन्ही संघांमध्ये २२ एकदिवसीय सामने खेळले गेलेत. भारताने १७ तर बांगलादेशने ४ सामने जिंकले.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे