क्रिकेटपटू आशुतोष शर्माने रचला इतिहास, ११ चेंडूत अर्धशतक ठोकून युवराज सिंगचा १६ वर्ष जुना विक्रम मोडला

मुंबई, १८ ऑक्टोंबर २०२३ : भारतीय फलंदाज आशुतोष शर्माने मंगळवारी (१७ ऑक्टोबर) नवा इतिहास रचला आहे. सर्वात कमी बॉलमध्ये अर्धशतक करणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. त्याने देशांतर्गत टी-२० स्पर्धेत सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये अवघ्या ११ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. यासह त्याने भारताचा माजी दिग्गज अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगचा १६ वर्ष जुना विक्रम मोडला. याआधी, भारताचा माजी फलंदाज युवराज सिंगने २००७ च्या टी-२० विश्वचषकात इंग्लंडविरुद्ध १२ चेंडूत अर्धशतक झळकावले होते.

रेल्वेकडून खेळत असलेल्या आशुतोषने, अरुणाचल प्रदेशच्या गोलंदाजांना चपराक दिली. त्याने आपले अर्धशतक ११ चेंडूत पूर्ण केले. त्याने आपल्या खेळीत १ चौकार आणि ८ षटकार मारले. मात्र, १२ चेंडूत ५३ धावांची खेळी खेळून आशुतोष बाद झाला. आशुतोषच्या झंझावाती खेळीच्या जोरावर रेल्वेने निर्धारित २० षटकांत २४५/५ धावा केल्या.

आशुतोषने यष्टिरक्षक फलंदाज उपेंद्र यादव याच्यासोबत पाचव्या विकेटसाठी ९६ धावांची भागीदारी केली. १९व्या षटकात आशुतोषला बॉलर याब नियाने पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. तर उपेंद्र ५१ चेंडूत १०३ धावा करून नाबाद राहिला. त्याने आपल्या खेळीत ६ चौकार आणि ९ षटकार मारले. आशुतोष आणि उपेंद्र यादव यांच्या फलंदाजीमुळे रेल्वेने २४६ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात अरुणाचल प्रदेश ११९ धावांवर बाद होऊन १२७ धावांनी पराभूत झाला.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा