मुंबई, २९ सप्टेंबर २०२३ : गेल्या दहा दिवसापासून मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रभरात गणेश भक्त गणपती बाप्पांच्या आगमनाने भक्ती भावात न्हाऊन निघाले होते. मुंबईसह राज्यभरात गणेशोत्सवाचा जल्लोष गेल्या दहा दिवसांपासून सुरू होता. कल भक्तीभावाने आणि मनोभावे पूजा-अर्चना करून भाविकांना आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला.
मुंबईची शान आणि नवसाला पावणारा गणपती म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या लालबागच्या राजाला, तब्बल २३ तास सुरू असलेल्या मिरवणुकीनंतर जड अंतःकरणाने आज सकाळी ९ वाजता निरोप देण्यात आला. लालबागच्या राजाचे गिरगाव चौपाटीवर आज सकाळी ९ वाजेच्या सुमारास विसर्जन झाले. गेली दहा दिवस राजाची पूजा आणि सेवा केल्यानंतर लालबागच्या राजाला भाविकांकडून निरोप देण्यात आला.
काल आरती करून सकाळी १० वाजता हा बाप्पा मंडळातून विसर्जनाकरता बाहेर पडला. ढोलताशांच्या नादात, पारंपरिक वाद्यसह बँड पथकाच्या निनादात पुष्पवृष्टी करत, गुलालाची उधळण बाप्पावर होत, बाप्पा विसर्जनासाठी मार्गस्थ झाला होता. यावेळी हजारोंच्या संख्येने तरूणांसह सर्वच लहान थोर भाविकांनी राजाला अखेरचा निरोप देण्यासाठी आणि दर्शन घेण्यासाठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले.
न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर