खुनातील आरोपीला पकडल्यानंतर पोलीसांना व्हावं लागलं कोरोनटाईन

पुरंदर, ११ ऑगस्ट २०२०: पुरंदर तालुक्यातील जेजुरी नजीक नाझरे सुपे येथे एकाने सासऱ्याचा खून केला होता. हा आरोपी खून करून फरार झाला होता. काल त्याच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या. मात्र या कारवाईत सहभागी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोन्टाईन होण्याची वेळ आली आहे. त्याचबरोबर त्याच्या सासऱ्यांना उपचारासाठी घेऊन गेलेल्या पोलिसांना सुद्धा कोरोन्टाईन व्हावं लागले आहे.

जेजुरी नजीकच्या नाझरे सुपे येथे सुरेश भोसले यांनी आपले सासरे किसन काळे यांचा चाकूने भोसकून खून केला होता. यानंतर जेजुरी पोलिसांनी काळे यांना उपचारासाठी ससून येथे दाखल केले होते. यावेळी त्यांच्या बरोबर जेजुरीतील दोन पोलीस कर्मचारी गेले होते. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. मात्र उपचार सुरू करण्यापूर्वी त्यांची कोरोना टेस्ट घेण्यात आली होती. मृत्यू नंतर ही टेस्ट कोरोना पॉझिटिव आली आहे. त्यामुळे आता त्यांना उपचारासाठी घेऊन गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.

त्याच बरोबर काल गुन्हे अन्वेषण पथकाने खुनातील आरोपी जावई सुरेश भोसले यास दौंड तालुक्यातून त्याच्या गावातून जेरबंद केले. मात्र पॉझिटिव असलेल्या सासर्‍यांशी त्याचा संबंध आल्याने त्याचीही कोरोना टेस्ट घेण्यात येणार आहे. त्याला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांनाही आता विलगीकरणात राहण्याची वेळ आली आहे. त्यामुळे आधीच कर्मचारी कमी असलेल्या जेजुरी पोलीस स्टेशनच्या पोलीस कर्मचाऱ्यांना आता कोरोन्टाईन व्हावे लागले आहे.

याबाबत बोलताना जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने म्हणाले की, आरोपी सुरेश भोसले आणि काळे यांचा एकमेकांशी संपर्क आला. तसेच काळे हे कोरोना पॉझिटिव निघाले. त्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना आता विलगीकरणात राहावे लागणार आहे. अशा प्रकारची ही पहिलीच घटना असल्याने पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये थोडीशी घबराट निर्माण झाली. मात्र घाबरण्याचं काही कारण नाही. लवकरच या सर्वांची सुद्धा कोरोना टेस्ट घेतली जाईल आणि मगच ते कामावर हजर होतील. तोपर्यंत कमी कर्मचाऱ्यातच काम करावे लागेल.

न्यूज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा