दिल्लीनंतर पंजाबने पेट्रोल आणि डिझेलवर वाढवला कर

पंजाब, दि. ६ मे २०२०: पंजाबमध्ये पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट वाढविण्यात आला आहे. पंजाबमध्ये डिझेलवरील व्हॅट १५.१५ टक्के करण्यात आला आहे, तर पेट्रोलवरील व्हॅट २३.३० टक्के करण्यात आला आहे. यानंतर पंजाबमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये प्रतिलिटर २ रुपयांपेक्षा जास्त वाढ होणार आहे.

इतर राज्यांचा ही व्हॅट वाढविण्याचा निर्णय:

पंजाबप्रमाणेच इतरही अनेक राज्यांनी व्हॅट वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीतही पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट वाढविण्यात आला आहे, त्यामुळे तेलाच्या किंमती वाढताना दिसत आहेत. पंजाब, हरियाणा आणि राजस्थान यांनीही असेच निर्णय घेतले आहेत. राजस्थानच्या अशोक गहलोत सरकारने मार्च महिन्यातच व्हॅट वाढविण्याचा निर्णय घेतला होता. राजस्थानमध्ये पेट्रोलवरील व्हॅट ३० टक्क्यांवरून ३४ टक्क्यांवर तर डिझेलवर २२ टक्क्यांवरून २६ टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

त्याचप्रमाणे हरियाणामध्ये तेलावरील व्हॅट आणि बसचे भाडे वाढविण्यात आले. यावर काँग्रेसने हरियाणा सरकारवर टीका केली. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला आणि हरियाणा काँग्रेसच्या प्रमुख कुमारी सेलजा यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितले की, सरकारने बस भाडे १५ रुपये प्रति किलोमीटर आणि व्हॅटमध्ये १ रुपये पेट्रोलवर आणि डिझेलवर १.१० रुपये वाढवले. दोन्ही नेते म्हणाले, मंडईतील फळे आणि भाजीपाला विक्रीवरही बाजार करामध्ये वाढ करण्यात आली. दुसरीकडे हरियाणा सरकारमधील मंत्री अनिल विज यांनी काँग्रेसच्या या टीकेला उत्तर देताना म्हटले आहे की, पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट वाढविण्यात आलेला राजस्थान सरकारचा निर्णय आपल्याला दिसत नाही.

हरियाणा, पंजाब आणि राजस्थान व्यतिरिक्त दिल्लीतही व्हॅट वाढविण्यात आला आहे. देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोलच्या किंमतीत १.६७ रुपये आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर ७.१० रुपयांनी वाढ झाली आहे. दिल्ली सरकारने मंगळवारी याची घोषणा केली. पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट वाढीमुळे दोन्ही तेलांच्या किंमतींमध्ये ही वाढ दिसून आली. दिल्ली सरकारच्या या निर्णयाला भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस या दोघांनी विरोध दर्शविला आहे. त्यामुळे दिल्लीतील गरीब आणि शेतकर्‍यांना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागणार असल्याचे भाजपने म्हटले आहे. काँग्रेसचे म्हणणे आहे की, व्हॅटचा दर आपल्या सरकारमध्ये कमी ठेवण्यात आला होता, परंतु सध्याच्या सरकारने ते निर्घृणपणे वाढविले आहे. त्यामुळे वाढलेला दर परत घेऊन लोकांना दिलासा मिळाला पाहिजे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा