मुंबई, ११ जून २०२३ : अरबी समुद्रामध्ये घोंघावणार्या बिपरजॉय चक्रीवादळाने आता मोठे रौद्र रूप धारण केले आहे. तौक्ते नंतर आता या चक्रीवादळाकडे अधिक शक्तिशाली वादळ म्हणून पाहिले जात आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाने किनारपट्टीच्या भागातील राज्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. यामध्ये प्रामुख्याने गुजरात, महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक राज्यांना हा इशारा देण्यात आला होता.
परंतु आता राज्यातील किनारपट्टीच्या भागातील तर प्रामुख्याने मुंबईवरिल संकंट टळले आहे. आयएमडीने दिलेल्या अंदाजानुसार, ‘बिपरजॉय चक्रीवादळाने आपला मार्ग बदलला असून ते आता पोरबंदरच्या दक्षिण-नैऋत्येस सुमारे ५१० किमी अंतरावर आहे. येत्या काही तासांत हे वादळ तीव्र होऊन १५ जून पर्यंत हे वादळ पाकिस्तान तसेच सौराष्ट्र आणि कच्छच्या किनार्याला धडकण्याची शक्यता आहे.
त्यामुळे हवामान विभागाकडून गुजरातच्या सौराष्ट्र आणि कच्छ भागाला यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर दक्षिण अरबी समुद्राच्या नजिकच्या भागात ५० ते ६० किमी प्रतितास वेगाने वारे वाहत आहे. तर महाराष्ट्र, गोवा, गुजरात आणि कर्नाटकच्या किनारपट्टी वर यामुळे मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर