खडसेंनंतर ‘या’ माजी आमदाराचा राष्ट्रवादीत होणार प्रवेश

कोल्हापूर, ६ नोव्हेंबर २०२०: राष्ट्रवादीमध्ये दिग्गज नेत्यांच्या पक्षप्रवेशाचे सत्र सुरुच आहे. एकनाथ खडसे यांच्यापाठोपाठ आणखी एक माजी आमदार राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील माजी आमदार राजीव आवळे मुंबईत राष्ट्रवादीचं घड्याळ हातात बांधणार आहेत. आवळे हे कोल्हापुरातील हातकणंगले विधानसभा मतदारसंघातून जनसुराज्य पक्षाचे माजी आमदार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित १० तारखेला राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचं वृत्त आहे.

राजीव आवळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचे निश्चित केले आहे. आवळेंच्या पक्षप्रवेशानंतर हातकणंगले मतदारसंघात राष्ट्रवादीचे बळ वाढण्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे. राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर आवळे यांचं राजकीय पुनर्वसन कसं होणार, याकडे त्यांच्या समर्थकांचे डोळे लागले आहेत.

इचलकरंजी नगरपालिकेचे नगराध्यक्षपद भूषवलेला सर्वात तरुण चेहरा अशी राजीव आवळे यांची ख्याती आहे. वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी त्यांनी पद काबीज केलं होतं. नगराध्यपदाच्या खुर्चीवर विराजमान असतानाच आवळेंनी वडगाव मतदारसंघाच्या निवडणुकीत उतरुन कोल्हापूरच्या राजकीय क्षेत्राचं लक्ष वेधून घेतलं होतं.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा